आपला चेहरा सुंदर दिसावा आणि तो चमकदार व नितळ असावा किंवा व्हावा, असे सगळ्यांनाच वाटत असते. मग त्यासाठी आपण अनेक उपाय वाचत असतो, सोशल मीडियावर पाहत असतो किंवा कोणीतरी त्याबाबत आपल्याला काही घरगुती उपायदेखील सुचवत असतात. अशा वेळेस त्वचेची काळजी घेताना या सगळ्यांमधून आपल्याला पटेल आणि आवडेल अशी एक गोष्ट निवडून, त्याची सुरुवात करतो. आता त्वचेच्या काळजीसाठी अनेक रुटीन आणि त्या रुटीनच्या स्टेप्स असतात; ज्या लक्षात ठेवायला जरा अवघड असतात. अशा वेळेस झटपट त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण फेसपॅकचा वापर करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तोंड धुवायचे, फेसपॅक लावायचा आणि काही वेळाने तो पाण्याने धुऊन टाकायचा की झाले. असे जर करीत असाल, तर जरा थांबा. कारण- घरगुती किंवा सोपे उपाय म्हणून काही लहान-लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते; ज्यामुळे त्वचेवर लावलेल्या फेसपॅकचा फायदा कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. अशा या पाच चुका कोणत्या आहेत ते पाहा.

हेही वाचा : चेहरा होईल मलईसारखा मऊ मुलायम; पाहा, हिवाळ्यात ‘हा’ घरगुती फेसपॅक घेईल त्वचेची काळजी

फेसमॅस्क लावताना टाळा या पाच चुका…

१. फेसपॅक त्वचेला चालतोय की नाही हे न तपासणे

आपल्या चेहऱ्यावर आपण जे उत्पादन लावत आहोत किंवा घरगुती उपाय करून बघत असल्यास, त्यामधील घटकांनी त्वचेला काही त्रास तर होत नाहीये ना हे तपासून न बघितल्याने कधी कधी चेहऱ्यावर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळ्या प्रकारची असते; तसेच प्रत्येक त्वचेला सर्व गोष्टी चालतील, असे नसते. त्यामुळे कोणतेही उत्पादन चेहऱ्याला लावण्याआधी, ते थोडेसे आपल्या हातावर लावून बघावे.

२. अतिवापर करणे

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चुकीचा असतो. हाच नियम फेसपॅकसाठीही लागू पडतो. त्वचेसाठी तो फायदेशीर असतो. म्हणून जर तुम्ही दररोज फेसपॅकचा वापर केलात, तर त्वचेचा कोरडेपणा वाढणे, चेहरा लाल होणे किंवा त्वचेची चिडचिड यांसारखे दुष्परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे उत्पादनाच्या खोक्यावर दिलेल्या सूचनेनुसार किंवा त्वचातज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच चेहऱ्यावर फेसपॅकचा वापर करावा.

३. चेहरा न धुणे

नुसताच चेहरा ओल्या टॉवेलने पुसल्यानंतर किंवा तोंड न धुता, त्यावरच फेसपॅक लावल्याने त्याचा त्वचेसाठी फार काही उपयोग होणार नाही. कारण- जर चेहरा स्वच्छ नसेल, तर फेसपॅकमधील उपयुक्त घटक त्वचेमध्ये शोषून घेण्यास त्वचेला अडथळा निर्माण होऊन, त्याचा आपल्याला फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे नेहमी एखादा फेसपॅक लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे.

४. फेसपॅक गरजेपेक्षा अधिक काळ चेहऱ्याला लावणे

फेसपॅकमुळे चेहऱ्याला फायदा होतो, म्हणून तो गरजेपेक्षा जास्त काळासाठी त्वचेवर लावून चालत नाही. फेसपॅक चेहऱ्याला किती वेळासाठी लावून ठेवणे योग्य असते, हे त्या उत्पादनाच्या खोक्यावर लिहिलेले असते. तुम्ही जर त्या वेळेपेक्षा अधिक काळ तो पॅक चेहऱ्याला लावून ठेवलात; तर त्याचा त्रास त्वचेला होतो. परिणामी, चेहरा कोरडा पडणे, चेहरा लाल होणे किंवा त्वचेची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे उत्पादनाच्या खोक्यावर सांगितलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ फेसपॅक चेहऱ्यावर लावणे टाळावे.

हेही वाचा : घरातील ‘हा’ नेहमीच्या वापरातील पदार्थ त्वचा ठेवेल मऊ अन् चमकदार; पाहा हा घरगुती उपाय

५. विविध उतपादने एकत्र करणे

एकाचवेळी अनेक उत्पादने चेहऱ्यावर वापरल्यास त्यामधील असणारे घटक एकमेकांसोबत मिसळतील असे नाही. त्यामुळे, चेहऱ्याची काळजी घेताना एकावेळी एकच उत्पादन वापरावे. अन्यथा चेहरा लाल होणे, चिडचिड होणे किंवा ऍलर्जी सारखे त्रास उद्भवू शकतात. म्हणून, त्वचेची काळजी घेण्याआधी एखाद्या त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

प्रत्येक व्यक्तीची त्वचा ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. अशा वेळेस जर एखादे स्किन केअर रुटीन सुरु करणार असाल किंवा त्वचेसंबंधी कोणतेही प्रश्न असल्यास, जवळच्या त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असून, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid doing these five basic mistakes while using face pack use these skin care tips dha