सकाळी चालायला जाण्यासारखं सोपा आणि उपयुक्त असा दुसरा कोणताही व्यायाम नाही. केवळ अर्धातास चालण्याने तुमच्या शरीराचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. परंतु हा व्यायाम जर योग्य पद्धतीने केला तरच त्याचा फायदा होतो. खरंतर कोणताही व्यायाम योग्य पद्धतीने केला तरच त्याचा पूर्णपणे उपयोग होतो. अनेकदा सोप्यातला सोपा व्यायाम करतानाही नकळत आपल्याकडून त्यामध्ये अनेक चुका होत असतात. म्हणूनच, दररोज व्यायाम करूनदेखील तुम्हाला हवा तो परिणाम दिसत नाही.
अनेकजण येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून व्यायाम करण्याचा, दररोज सकाळी चालायला जाण्याचा संकल्प सुरु करतील. अशा मंडळींमध्ये तुमचाही नंबर असेल तर चालायला जाण्याआधी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे ते पाहा.
चालायचा व्यायाम करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवा, पाहा
१. वेळ आणि जागा
अनेकदा आपण चालायला जाताना, जागा किंवा वेळ न बघता जातो. बंद ठिकाणांपेक्षा, खुल्या/ मोकळ्या जागेत तुम्ही चालायला गेल्यास शरीराला सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते. परंतु शुद्ध हवा आणि चांगला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी जिथे गाड्यांचे प्रमाण जास्त आहे, गर्दी आहे अशा ठिकाणी चालायला जाणे टाळावे. सकाळी सात वाजल्यानंतर हवेमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. त्यामुळे चालायला जाताना यासर्व गोष्टी लक्षात ठेऊन, वेळ व जागा निवडावी.
हेही वाचा : दिवसातून ८ ते १० हजार पावलं चालणं होईल सोपं; पाहा, तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ हॅक्स ठरतील उपयुक्त…
२. व्यायामाचे कपडे आणि बूट
व्यायामादरम्यान आपण बरेच अंतर चालत असतो. त्यामुळे पायाला त्रास होणार नाही असे बूट आणि सुटसुटीत कपडे घालावे. बूट आणि कपडे दोन्ही गोष्टी वजनाला हलक्या असल्यास त्याने तुम्हाला त्रास होणार नाही.
३. पाणी पिणे
चालायला जाण्याआधी १५ ते २० मिनिटांपूर्वी एक-दोन घोट पाणी प्यावे. व्यायामाआधी जास्त प्रमाण पाणी पिणे त्रासदायक ठरू शकते आणि याचा परिणाम तुमच्या चालण्यावरही होऊ शकतो.
४. शरीराची ठेवण [posture] व्यवस्थित ठेवणे
चालताना तुमच्या शरीराची ठेवण योग्य नसल्यास पाठदुखी, गुडघेदुखी आणि पाय दुखण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. असे होऊ नये यासाठी चालताना पाठीचा कणा आणि मान ताठ व सरळ रेषेत असणे महत्वाचे आहे. तुम्ही पाठीत वाकून/पोक काढून चालत असल्यास तुमच्या स्नायूंना त्याचा त्रास होऊन, व्यायामादरम्यान श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.
हेही वाचा : सकाळच्या ‘या’ सवयी ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त; हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची पाहा…..
५. चालण्याची पद्धत
ठरवलेल्या वेळेत जास्त प्रमाणात अंतर चालण्यासाठी विनाकारण मोठी पाऊले टाकू नका. लहान किंवा नेहमी चालत्या त्याप्रमाणे पाऊले टाकून ठरवलेले अंतर पूर्ण करा. गरज नसताना वेगात आणि मोठी पाऊले टाकून चालण्याने गुडघ्यावर ताण पडतो.
[टिप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असून, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये]