Ayurvedic Digestion Tips: “जेवल्यावर आंघोळ करू नये, शास्त्र असतं ते” तुम्हालाही कुटुंबातील वयस्कर सदस्यांनी असं कधी ना कधी नक्कीच सांगितलं असेल, हो ना? तुम्ही अंधश्रद्धा समजून त्यांचा सल्ला ऐकत नसाल तर थांबा. जेवणानंतर आंघोळ करण्याबाबत आयुर्वेदातही स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. केवळ आंघोळच नव्हे तर आंघोळीच्या संबंधित अन्यही सवयी या तुमच्या पचनसंस्था व एकूणच आरोग्यावर थेट परिणाम करू शकतात. आहारतज्ज्ञ डॉ गरिमा गोयल यांनी सांगितल्यानुसार, आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा शरीरावर दिसून येतो, आंघोळ सुद्धा त्यातीलच एक घटक आहे. जेवणानंतर आंघोळ केल्यास शरीरावर नेमका काय प्रभाव दिसून येतो हे सविस्तर जाणून घेऊयात..
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास रील शेअर केली होती. यात आंघोळीच्या बाबत लक्षात ठेवण्याच्या गोष्टींची माहिती दिली होती.
डॉ. डिंपल जांगडा यांनी सांगितल्यानुसार, आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. “कोमट पाणी प्यायल्याने तुमचे शरीर आतून गरम होते” ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे तुमचे त्वचेच्या संबंधित त्रासही कमी होण्यास मदत होते. *जेवल्यानंतर कधीही आंघोळ करू नका:
आपल्या शरीरात जेवल्यानंतर पाचक अग्नी जागृत होतो, ज्यामुळे पोटात व आतड्यांमध्ये एक उबदार ऊर्जा तयार होते, यानुसार पचनप्रक्रिया पार पडते. पचन व पोषक तत्वांचे शोषण रक्तात करून घेण्याची क्रिया याचवेळी पार पडते. यावेळी पचन संस्थेतील कार्यरत अवयवांना शरीर रक्त पुरवठा करते जेणेकरून पचनक्रिया जलद व्हावी मात्र अशावेळी आंघोळ केल्यास शरीराचे तापमान बदलून रक्तप्रवाहात अडथळा येतो व पचनक्रिया मंदावते.
आंघोळीचे तीन नियम
इंस्टाग्रामच्या या व्हायरल व्हिडिओला डॉक्टर गरिमा यांनी सुद्धा सहमती दर्शवली. डॉक्टर सांगतात की, जेवणानंतर आंघोळ केल्याने, काही व्यक्तींना अपचनच नव्हे तर शरीराला सूज येण्याचाही धोका असतो. आपल्यापैकी अनेकांना दोन वेळेस आंघोळीची सवय असते. आपणही जेवल्यानंतर व झोपण्याआधी आंघोळ करत असाल तर यामुळे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, मग आंघोळीची नेमकी योग्य वेळ कोणती? चला तर पाहुयात..
- जेवणानंतर किमान एक तास थांबून मगच आंघोळ करावी असा सल्ला डॉ. गरिमा देतात.
- जेवणापूर्वी आंघोळ करणे याहून फायद्याचे ठरू शकते, यामुळे तुमचे शरीर टवटवीत होतेच पण भूक सुद्धा चांगली लागते.
- सूर्यास्तानंतर आंघोळ करणे टाळा. सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते, तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते. यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊ शकते ज्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो.
- रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आंघोळीसाठी कोमट किंवा साधारण तापमान असणारे पाणी वापरा. चेहरा व केसावर कधीच अगदी गरम किंवा थंड असे पाणी वापरू नका. तसेच गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी गरम पाणी वापरणे टाळा.
विश्लेषण : व्यायामाची सर्वात योग्य वेळ कोणती? ३० मिनिटांच्या वर्कआऊटचा किती फरक पडतो? जाणून घ्या!
- आपण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याची किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. बर्फाने आंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक अॅसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुधारण्यासाठी आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश (अभ्यंगम) केल्याचा फायदा होऊ शकतो.