मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरात वाहनांच्या धुराचे प्रदूषण असलेल्या भर रस्त्याला लागून घर असलेले शिंदेकाका २५ वर्षे घरीच शिलाईचा व्यवसाय करीत होते. त्यातच त्यांच्या आईला व बहिणीला असलेला जुनाट दम्याचा आजार आनुवंशिकतेने त्यांनाही अनेक वर्षे त्रस्त करीत होता. २००५ मध्ये ताप, उचकी, दमा औषधाने आटोक्यात न आल्याने शिंदेकाकाकांनी वैद्यकीय सल्ल्याने सी.टी. स्कॅन व बायॉप्सी या तपासण्या केल्या असता श्वासनलिका व फुप्फुसाचा दुसऱ्या ग्रेडचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. शस्त्रकर्माने फुप्फुसाचा कॅन्सरग्रस्त भाग काढला खरा, परंतु तीन वर्षांनी फुप्फुसात कॅन्सरचा पुनरुद्भव झाला. या वेळी शिरेवाटे व मुखावाटे केमोथेरॅपी सुरू केल्यावर त्यांनी नियमितपणे आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. गेली सहा वर्षे शिंदेकाकाका निरामय आयुष्य जगत आहेत व पूर्वीच्याच जोमाने शिलाईचा व्यवसाय सांभाळत आहेत.
कारणे – पर्यावरणाच्या मनुष्यनिर्मित असंतुलनामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण व त्यामुळे विशेषत: शहरात सर्दी, खोकला, दम्यापासून फुप्फुसाच्या कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापर्यंत श्वसनसंस्थेच्या आजारांचे आबालवृद्धांमध्ये झपाटय़ाने वाढत असलेले प्रमाण ही सध्याची मोठी समस्या आहे. दरवर्षी जगभरात १८ लाख रुग्णांचे फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान होते व १३ लाख ७० हजार रुग्ण फुप्फुसाच्या कॅन्सरने मृत्यू पावतात. यापकी ५८ टक्के रुग्ण विकसनशील देशातील आहेत. प्रदूषणाप्रमाणेच अनेक वर्षे व मोठय़ा प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची संभावना अधिक असते. अॅसबेस्टॉस, आस्रेनिक ,सिलिका, क्रोमियम, डिझेलचा धूर यांच्या संपर्कात सतत काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये, विशेषत: खाण कामगार व ड्रायव्हर यांच्यात फुप्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळते. याशिवाय पूर्वी दमा, न्यूमोनिया असे फुप्फुसाचे आजार झाले असल्यास, फुप्फुसाच्या किंवा अन्य प्रकारच्या कॅन्सरची आनुवंशिकता असल्यास, एच.आय.व्ही., एड्ससारख्या आजारांनी व्याधीप्रतिकारशक्ती कमी झालेली असल्यास व अतिशय कमी शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींत हा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. आमच्या संशोधन प्रकल्पात समाविष्ट झालेल्या तीनशेहून अधिक फुप्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला असता दही – केळे – पेरू – काकडी अशा शरीरात कफाचा स्राव निर्माण करून प्राणवह व अन्नवह स्रोतसांत अडथळा निर्माण करणारा अभिष्यंदी आहार; श्रीखंड – बासुंदी – पेढे – बर्फी – बंगाली मिठाई असे पचण्यास अतिशय जड व मधुर रसाचे कफवर्धक पदार्थ; चिंच – व्हिनेगार असे अतिशय आंबट पदार्थ; लोणचे – पापड – फरसाण असे मीठ अधिक असलेले पदार्थ; फ्रिजमधील पाणी – शीतपेय – आइस्क्रीम असे अतिथंड पदार्थ; मासे व मांसाहार यांचे अधिक प्रमाणात व वारंवार सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आढळले. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लिटरभर पाणी पिण्याची सवयही बहुतांशी रुग्णांना होती. तसेच दुपारी जेवल्यावर लगेचच झोपणे म्हणजेच दिवास्वाप व अव्यायाम म्हणजे शारीरिक कष्ट – व्यायाम न करणे असा चुकीचा विहारही अनेक रुग्णांत आढळला. आयुर्वेदानुसार उपरोक्त आहार-विहार अतिरिक्त कफ व क्लेदाची निर्मिती करून अन्नपचनाची क्रिया म्हणजेच जाठराग्नि मंद करतो व पचनासंस्था (अन्नवह स्रोतस) व पर्यायाने श्वसनसंस्था (प्राणवह स्रोतस) यांच्यात विकृती निर्माण करून फुप्फुसाच्या कॅन्सरला हेतुभूत ठरतो. या कारणांशिवाय पित्ताची व रक्ताची विकृती निर्माण करणारे मिरचीसारखे अतितिखट पदार्थ, शिळे पदार्थ व विरुद्धान्न तसेच अतिक्रोध व मानसिक ताण ही कारणेही बहुतांशी फुप्फुसाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांत आढळली. आयुर्वेदानुसार फुप्फुस या अवयवाची निर्मितीच रक्तधातूपासून झाली असल्याने रक्तदुष्टी करणारी कारणे फुप्फुसात विकृती निर्माण करण्यास निश्चितच कारणीभूत ठरतात. तसेच वातदोषाची दुष्टी करणारे वाटाणा, पावटा, बेसन असे पदार्थ; ब्रेड-बिस्किटसारखे कोरडे बेकरीचे पदार्थ असा आहारही सतत व अधिक मात्रेत सेवन केल्यास फुप्फुसात विकृती निर्माण करतो.
लक्षणे व तपासण्या – दीर्घकाळ बरा न होणारा खोकला, दमा, कफातून रक्त पडणे, छातीत घुरघुर होणे, आवाज बसणे, खांदा – पाठ – छाती किंवा हात दुखणे, अशक्तपणा, ताप, सांधेदुखी, भूक मंदावणे, वजन घटणे, डोके दुखणे, चक्कर येणे, लिफनोडस् वाढणे ही लक्षणे फुप्फुसाच्या कॅन्सरमध्ये दिसतात. एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., पेटस् स्कॅन, ब्रेंकोस्कोपी व बायॉप्सी या तपासण्यांच्या साहाय्याने फुप्फुसाच्या कॅन्सरचे निदान निश्चित केले जाते.
यापुढील लेखात आपण फुप्फुसाच्या कॅन्सरच्या चिकित्सेबाबत माहिती घेऊ.