होळी, रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. होळीच्या दिवशीच आपला संपूर्ण भारत देश विविध रंगांमध्ये न्हाऊन निघतो. प्रत्येक व्यक्ती, गल्ली, गाव-शहर सगळे काही रंगीबेरंगी झालेले असते. तुमचाही होळीच्या दिवशी मित्र किंवा परिवारासह रंग खेळण्याचा बेत असेलच; हो ना? परंतु अनेकदा या रंगांनी आपल्या केसांना त्रास होतो. त्यांचा मऊपणा जाऊन, केस जरा खरखरीत होतात. बराच काळ केसांमध्ये रंग तसाच राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, असे होऊ नये यासाठी होळी खेळण्याआधी आणि रंग खेळल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी केल्याने तुम्हाला हा त्रास होणार नाही. त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने केसांची काळजी कशी घेऊ शकता हे आपण पाहणार आहोत. याची माहिती त्रया येथील आयुर्वेद विभागाचे प्रमुख [Head of Ayurveda at Traya] डॉ. शैलेंद्र चौबे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली असल्याचे त्यांच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : Beauty hack : ना रेझर, ना वॅक्स, ‘असे’ घालवा चेहऱ्यावरील केस! ‘हे’ ठरतील जादुई उपाय…

होळीदरम्यान केसांची आयुर्वेदिक पद्धतीने काळजी घेण्याच्या टिप्स

रंग खेळण्याआधी काय करावे?

१. केसांचा गुंता सोडवावा आणि तेल लावावे

तुम्ही होळी खेळायला जाण्याआधी केस व्यवस्थित विंचरून, केसांमध्ये असणारा गुंता सोडवून घ्या.
केस विंचरल्यानंतर त्यांना तेल लावून घ्या. त्यासाठी तुम्ही कोणतेही आयुर्वेदिक किंवा घाण्यावर काढलेले तेल वापरू शकता.
असे केल्याने होळी खेळताना रंग केसांमध्ये अडकून बसण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

२. केस बांधून ठेवा

रंग खेळताना केसांची छान वेणी किंवा अंबाडा बांधणे खूप फायदेशीर ठरू शकते.
अशी वेणी किंवा अंबाडा बांधल्याने तुमच्या केसांमध्ये रंग खूप प्रमाणात लागणार नाही. इतकेच नाही, तर त्यांचा गुंतादेखील होणार नाही.
केस जेवढे कमी गुंततील तेवढे ते कमी प्रमाणात तुटतील.

हेही वाचा : डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर डाग? ‘ही भाजी’ घेईल केस अन् त्वचेची काळजी, या ६ टिप्स पाहा

रंग खेळून झाल्यावर काय करावे?

१. केस विंचरून घ्या

केसांची वेणी किंवा अंबाडा सोडवून घ्या. आता कंगवा किंवा केसांच्या ब्रशच्या मदतीने हळुवारपणे सर्व केस विंचरून घ्या.
केसांमधील सर्व रंग शक्य तेवढा काढून टाका.

२. हेअर मास्कचा वापर करावा

केस धुण्याआधी केसांवर चांगल्या हेअर मास्कचा वापर करावा. त्यासाठी तुम्ही आवळा रस, रिठा पावडर, दही किंवा शिकेकाई यांसारख्या उत्तम आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. तुम्ही लावत असलेला हेअर मास्क केसांवर साधारण २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवावा. त्यामुळे केसांना छान कंडिशनिंग होते; तसेच केसांमध्ये अडकलेले रंग काढून टाकण्यास मदत मिळते.

३. सौम्य शाम्पूचा वापर

हेअर मास्क लावून झाल्यानंतर तुमचे केस एखाद्या सौम्य शाम्पूच्या मदतीने धुऊन घ्या. तुम्ही वापरत असलेल्या शाम्पूमध्ये रसायनांचे प्रमाण अधिक असल्यास केस खराब होऊ शकतात. त्यामुळे रंग खेळल्यानंतर केस धुताना एखाद्या चांगल्या सौम्य शाम्पूचा वापर करावा.

४. कोमट पाण्याचा वापर

तुम्ही जर केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलात, तर त्यामुळे केसांना त्रास होऊ शकतो, असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. त्यामुळे केस धुण्यासाठी कोमट किंवा गार पाण्याचा वापर करावा.

५. मॉइश्चरायझर आणि कंडिशनर

केस स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्यावर केसांना मॉइश्चराइझ करणारे चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावावे. असे केल्याने केसांना मऊपणा प्राप्त होण्यास मदत होईल.

या स्टेप्सचे पालन जर तुम्ही होळी खेळण्याआधी आणि होळी खेळल्यानंतर केले, तर तुमचे केस खराब होण्याची शक्यता फार कमी आहे. तसेच केस तुटण्याचा किंवा ते खरखरीत होण्याचा त्रासदेखील होणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic hair care tips for holi how to maintain your hair during festival of colors follow simple steps dha