आता तुमचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक देखील आरोग्य सेतू अॅपद्वारे जनरेट केला जाऊ शकतो. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आपली प्रमुख योजना आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) आरोग्य सेतूमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे. यासह, आरोग्य सेतू वापरकर्ते सहजपणे ABHA (आयुष्मान भारत आरोग्य खाते) क्रमांक तयार करू शकतील. आता २१.४ कोटीहूनअधिक आरोग्य सेतू वापरकर्ते अॅपद्वारे १४ अंकी युनिक नंबर जनरेट करू शकतील.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत युजर्स युनिक आयुष्मान भारत आरोग्य क्रमांक तयार करू शकतात. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट्स, हॉस्पिटल रेकॉर्डसह तुमचे जुने आणि नवीन वैद्यकीय रेकॉर्ड जोडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे कोणत्याही नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसह सहजपणे शेअर केले जाऊ शकते आणि ऑनलाइन आरोग्य सेवांचा लाभही घेऊ शकतात. या एकत्रीकरणामुळे लोक आता कोठूनही त्यांचे वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड पाहू शकतील आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य प्रणालीच्या आवश्यक सेवांचा लाभ घेऊ शकतील.
आयुष्मान भारत आरोग्य क्रमांक (ABHA)असा तयार करा
- आरोग्य सेतू अॅपद्वारे तुम्ही ABHA क्रमांक सहजपणे जनरेट करू शकता. यामध्ये युजर्सचा आधार क्रमांक आणि नाव, जन्म वर्ष, लिंग आणि पत्ता यांसारख्या तपशीलांद्वारे करता योतो. मात्र, आधार OTP द्वारे प्रमाणीकरण केल्यानंतर ही माहिती आपोआप भरली जाते.
- आधारकार्ड नसतानाही तुम्ही हा नंबर जनरेट करू शकता. यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मोबाईल नंबर वापरावा लागेल.
- ABHA नंबर https://abdm.gov.in/ किंवा ABHA अॅप (https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr) किंवा आयुष्मान भारत सोबत एकत्रित केलेल्या अॅप्सवरून जनरेट करू शकता.
या एकत्रीकरणावर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ आर एस शर्मा म्हणाले की, आरोग्य सेतूने करोना महामारीविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य सेतू आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) यांच्या एकत्रीकरणामुळे आता आरोग्य सेतू वापरकर्त्यांनाही एबीडीएमचे फायदे उपलब्ध होतील.