आपल्या पोटात १०० ट्रिलियनहून अधिक जीवाणू सुखेनैव राहत असतात व ते थेट मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करीत असतात, असे संशोधकांनी अभ्यासाअंती सांगितले. हे संशोधन करणाऱ्यात एका भारतीयाचाही समावेश आहे.
जर्नल ऑफ मेडिसिनल फूड या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात न्यूयॉर्क येथील फाउंडेशन फॉर इंटीग्रेटेड मेडिसिनचे लिओ गॅलंड यांनी म्हटले आहे की, पोटातील जीवाणू जी प्रथिने तयार करतात त्यांचा केंद्रीय चेतासंस्थेशी संबंध असतो.
जीवाणू मेंदूतील चेतासंस्थेवर कशा प्रकारे परिणाम करतात हे वेगवेगळ्या पद्धतींनी गॅलंड यांनी दाखवून दिले आहे. या जीवाणूंमुळे प्रतिकारशक्ती प्रणालीस उत्तेजन देणारी काही रसायने, संप्रेरके व मेंदूतील संवाहक रसायने तयार होतात. अशीच रसायने, संप्रेरके शरीर इतरवेळी नैसर्गिक पातळीवरही कुठली उत्तेजना नसताना तयार करीत असते.
ओरलँडो येथील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडाच्या हृदयरोग विज्ञान विभागाचे प्रमुख व सह मुख्यसंपादक संपथ पार्थसारथी यांनी असे म्हटले आहे की, मायक्रोबायोम हा वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचा विषय ठरत आहे. प्रतिकारशक्तीशी निगडित असलेले रोग व हृदयरोग यांच्याशी त्यांचा संबंध आहे.
पार्थसारथी यांनी सांगितले की, पोटातील चांगले जीवाणू कुठले व वाईट जीवाणू कुठले हे वैज्ञानिकांना माहिती आहे पण आतडय़ाव्यतिरिक्तही चयापचयाच्या क्रियेत ते सहभागी असतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. सध्या काही कंपन्या प्रोबायोटिक्स म्हणजे सुजैविकांच्या नावाखाली पोटात चांगले जीवाणू तयार केल्याने मेंदूचे स्वास्थ्य लाभते अशा दावा करीत असल्या तरी प्रत्यक्षात मेंदूवैज्ञानिकांच्या मते प्रत्यक्षात स्थिती तशी नाही.
आपल्या पोटात असलेल्या मायक्रोबायोममुळे स्वमग्नता, नैराश्य असे आजार जडू शकतात. मेंदूच्या सुरुवातीच्या घडणीतही हे जीवाणू परिणाम करीत असतात. मायक्रोबायोमचा मेंदूवरील परिणाम तपासण्यासाठी अमेरिकेने १० लाख डॉलर्सचा कार्यक्रम आखला आहे. त्यात पॅसाडेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सारकिस माझमनियन यांनी सांगितले की, या संशोधनातून पोटातील जीवाणूंचा कसा परिणाम होत जातो यावर नवीन प्रकाश पडेल.