दुचाकी क्षेत्रातील भारतीय बाजारातील लोकप्रिय कंपनी बजाजने आपल्या पल्सर 150 बाइकचे ‘अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) व्हेरिअंट लाँच केले आहे. यामध्ये Pulsar 150, Pulsar 150 Neon आणि Pulsar 150 Twin Disc या बाइक्सचा समावेश आहे. ‘एबीएस’च्या अपडेटमुळे या तिनही बाइक्सच्या किंमतीमध्ये 3 ते 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
बजाजने तिन्ही बाइक्समध्ये सिंगल चॅनल एबीएस दिलं आहे. एबीएस फीचरमुळे 150 Neon ची किंमत 68,250 रुपये, स्टँडर्ड पल्सर 150 ची किंमत 84 हजार 461 रुपये आणि पल्सर 150 ट्विन डिस्कची किंमत 88 हजार 339 रुपये झाली आहे. पल्सर 150 Neon ची किंमत 3 हजार रुपयांनी आणि इतर दोन बाइक्सच्या किंमतीत जवळपास 7 हजारांची वाढ झाली आहे. पल्सर 150 मालिकेतील बाइक्समध्ये 149.5cc, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,000rpm वर 14hp पावर आणि 6,000rpm वर 13.4Nm टॉर्क जनरेट करतं.
एबीएस –
भारतात अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस), एअर बॅग्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम (सीबीसी) आता नव्या गाडय़ांना सक्तीचे झाले आहे. अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) ही वाहनांना बसविण्यात येणारी ब्रेक संदर्भातील सुरक्षा प्रणाली आहे. पारंपरिक ब्रेकिंग सिस्टीममध्ये अचानक ब्रेक दाबल्यामुळे चाके लॉक होतात व गाडी घसरते. पण एबीएसमुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. तसेच या सिस्टीममुळे चाके लॉक न होता एका सेकंदामध्ये कितितरी वेळा ब्रेक लागला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. यामुळे ओल्या रस्त्यावरही एबीएस उत्तमपणे कार्य करते, असा अनुभव आहे. जागतिक पातळीवर १९२९ मध्ये पहिल्यांदा विमानासाठी ही प्रणाली विकसित झाली. त्यानंतर पुढे साठच्या दशकात सर्वप्रथम दुचाकीसाठी व नंतर सत्तरच्या दशकात कारमध्ये वापरली गेली. या सिस्टीममध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मोडय़ूल असते आणि याच्या आधारेच ब्रेकचा दाब निश्चित होत असतो.