हृदयाच्या संधिवातात जर रोज बेकिंग सोडय़ाची एक मात्रा घेतली तर हानीकारक परिणाम कमी होतात, असे एका संशोधनात दिसून आले आहे.
अमेरिकेतील ऑगस्टा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार अँटॅसिड म्हणून दुकानात सहज मिळणारा खाण्याचा सोडा अशा रुग्णांनी रोज पाण्यातून घेतला तर त्यांच्या शरीरातील प्लीहेला योग्य तो संदेश जाऊन या रोगातील वेदनादायी भाग कमी केला जातो.
‘जर्नल ऑफ इम्युनॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून जेव्हा उंदरांना सोडियम बायकाबरेनेट देण्यात आले तेव्हा पोटात एक प्रकारची उत्तेजना निर्माण होऊन त्यात पुढचे जेवण पचवण्यासाठी अधिक आम्ल तयार झाले. यात प्लीहा या मुठीच्या आकाराच्या अवयवावरील मेसोथेलिकल पेशींना योग्य संदेश जाऊन प्रतिकारशक्ती प्रणालीचा प्रतिसाद कमी करण्यास सांगितले जाते. मेसोथेलियल पेशी या शरीरातील पचनमार्गाच्या खोबण्यांमध्येही असतात, तसेच अंतर्गत भागांच्या आवरणावर असतात, त्यामुळे ते घासले जात नाहीत.
जेव्हा अवयवावर हल्ला होण्याची भीती असते तेव्हा मायक्रोव्हिलीमुळे अवयव गरम होऊन बाहेरून धोका असल्याचा संदेश मिळत असतो. प्लीहा ही प्रतिकारशक्ती प्रणालीचा भाग असते ती बेकिंग सोडा प्यायल्यानंतर वेगळा प्रतिसाद देते. त्यात मायक्रोफॅजेस या प्रतिकार पेशींचे रक्त व मूत्रपिंडातील स्वरूप एम १ वरून एम २ वर जाते. एम १ या वेदना निर्माण करणाऱ्या पेशी असतात.
हा बदल माणसात चार तास तर उंदरात तीन दिवस टिकून राहतो, त्यामुळे स्वनाशक प्रतिकारशक्ती प्रणालीशी संबंधित रोगात याचा उपयोग होऊ शकतो.