सध्या १८ ते ३५ वयोगटातील लोकांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. ४७.५ टक्के पुरुषांमध्ये केस गळण्याची समस्या आहे. त्यामुळे अनेकांना न्यूनगंड येतो. तसेच टक्कल पडल्यामुळे कुटुंब, मित्रमंडळी आणि समाजात वावरणं कमी होतं. आपल्याला टक्कल पडलं म्हणून अनेक जण महिनोंमहिने घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे वेगवेगळे उपाय करून केस पुन्हा उगवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र महागडे उपाय करूनही पदरी निराशा येते. त्यामुळे अनेक वर्ष उलटल्यानंतर प्रयत्न सोडून दिले जातात. अनेकदा अनुवंशिक, लाइफस्टाइल, खाणंपिणं, रसायनयुक्त शॅम्पू-कंडिशनर याचा मोठ्या प्रमाणात होणार उपयोग यामुळे केस गळती होत असल्याचं दिसत आहे. जगभरात टक्कल पडण्याचं प्रमाण पाहता यावर रिसर्च सुरु आहे. नुकताच एका शोधातून समोर आलं आहे की, पुरुषांमधील टक्कल पडण्याची समस्या दूर केली जाऊ शकते.
पुरुषांमध्ये केस गळणे याला एंड्रोजेनिक अलोपेसिया किंवा मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणतात. यामध्ये टाळूवरच्या पेशी नष्ट होतात, त्यामुळे नवीन केस उगवत नाहीत. केसांच्या छिद्रांजवळ रक्तवाहिन्या नसल्यामुळे असं होतं. वास्तविक, केसांच्या छिद्रांजवळ रक्तवाहिन्यांची कमतरता असते, ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आणि पुरेसे पोषण केसांपर्यंत पोहोचत नाही आणि केसांची वाढ होत नाही. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी उंदरांवर केस वाढवणाऱ्या इतर उपचारांपेक्षा वेगाने केस वाढवले. संशोधनात मायक्रोनीडल पॅचमधील सेरिअम नॅनोकणांचा समावेश होता, जे केस गळणे, शरीरातील पेशींमधील पोषक घटकांचे खराब परिसंचरण आणि ऑक्सिडेटिव्ह ताण याला सामोरे जाण्यासाठी प्रभावी होते.
शास्त्रज्ञांनी बायोडिग्रेडेबल पॉलीथिलीन ग्लायकोल-लिपिड कंपाऊंडमध्ये सिरियम नॅनोकण गुंडाळले. नंतर त्वचेवर आढळणारे हायलुरोनिक ऍसिड वापरून विरघळणारे मायक्रोनीडल पॅच तयार केले. पॅच म्हणजे कृत्रिम विग तयार केले. यानंतर कंपाऊंडमध्ये नॅनोकण जोडले गेले, जेणेकरून एक साचा तयार करता येईल. चाचणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रथम उंदरांवर केस काढण्याची क्रीम लावले. यामुळे उंदरांच्या त्या भागाचे केस गेले. मग त्याने केस काढण्याच्या जागेवर पॅच लावला. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, ज्या उंदरांसाठी खास तयार केलेले पॅच वापरले होते त्यांच्यामध्ये जास्त फरक होता. त्या उंदरांमध्ये नवीन केस वाढण्याचे प्रमाण अधिक होते. विशेष पॅच असलेल्या उंदरांचे केस इतर उपचारांपेक्षा जलद वाढलेले दिसले. त्यामुळे येत्या काही महिन्यात हा प्रयोग मानवावर केला जाऊ शकतो. जर हा प्रयोग मानवावर यशस्वी झाला तर टक्कल पडण्याची समस्या दूर होईल.