शरीरातील जखमा किंवा झीज भरून काढणारे जे रेणू असतात त्यांच्या मदतीने तुटलेली हाडे जोडणारी बंधपट्टी (बँडेज) विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. तुटलेली हाडे भरून येण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर यात करण्यात आला आहे. अॅडव्हान्सड मटेरियल या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधानुसार या बँडेजमुळे रक्तवाहिन्या तयार होण्यास मदत होते.
उंदरांवर याचे प्रयोग यशस्वी झाल्याने ते माणसातही यशस्वी होतील यात शंका नाही. यात तीन आठवडय़ात तुटलेली हाडे भरून येतात. अमेरिकेतील डय़ुक विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, या संशोधनातून तुटलेली हाडे जोडण्याच्या वैद्यकीय तंत्रात मोठे बदल घडून येतील. जैवविघटनशील बँडेजेस, प्रत्यारोपण आवरणे, हाडे बसवण्याची पद्धत यातही फायदा होणार आहे. कॅल्शियम फॉस्फेटने तुटलेली हाडे लवकर भरून येतात असे दिसून आले आहे त्याचा आधार यात घेण्यात आला. शायनी वर्गीज या डय़ुक विद्यापीठाच्या संशोधक यात एक सहलेखक आहेत त्यांनी म्हटले आहे की, अडेनोसिन हा रेणू हाडे भरून येणे व त्यांची वाढ यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.
वर्गीज व त्यांच्या चमूला हाडाच्या जखमेच्या ठिकाणी ती भरून येण्यासाठी अॅडनोसिन रेणू जमा झालेले दिसले त्यांचाच वापर करून हाडे नैसर्गिकरीत्या भरून येतात. पण हे रेणू जमा होतात व लगेच नाहीसे होतात त्यामुळे हाडे लवकर भरून येत नाहीत. आपल्या शरीरात अॅडेनोसिन कमी प्रमाणात उपलब्ध असते. ते हाडे भरून आणण्याशिवाय इतरही अनेक कामे करते. हाडे भरून येण्यासाठी हाड जिथे तुटले असेल तेथे अॅडेनोसिनचे प्रमाण वाढवण्याकरिता जैवघटकांचे एक बँडेज किंवा बंधपट्टी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या अॅडेनोसिन रेणूतील बंध पक्के होतात व ते दुसरीकडे जात नाहीत परिणामी तुटलेले हाड लवकर भरून येते.