जून महिन्यात तुम्हाला बँकेत काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, कारण ११ जूनपासून बँकांना सुट्ट्या सुरू होत आहेत. २६ जूनपर्यंत बँकांना ६ सुट्ट्या असून २७ जून रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप असणार आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात एकूण सुटी ७ दिवसांची असेल. मात्र, देशातील विविध ठिकाणी सुट्या वेगवेगळ्या दिवसांसाठी असणार आहेत.
पेन्शनशी संबंधित समस्या आणि पाच दिवसांच्या कामाच्या मागणीसाठी २७ जून रोजी पूर्ण दिवस संप करणार असल्याचे खासगी क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी म्हणाले. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ बँक एम्प्लॉइजसह नऊ बँक युनियन्सची संघटना आहे, यांनी हा संप पुकारला आहे.
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी यूएफबीयूच्या बैठकीनंतर सांगितले की, राष्ट्रीय पेन्शन योजनेत सुधारणा करून ती काढून टाकण्याची आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची मागणी आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या संपात ७ लाख कामगार सहभागी होणार असून, त्यामुळे कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
११ जून रोजी दुसरा शनिवार आणि १२ जूनला रविवार असल्याने बँका बंद राहतील. आयझॉल, भुवनेश्वर, जम्मू आणि श्रीनगरमधील बँका १५ जून रोजी वायएमए दिन, गुरु हरगोविंद यांचा जन्मदिन आणि राजा संक्रांतीच्या निमित्ताने बंद राहतील. त्यानंतर १९ तारखेला रविवार, २५ तारखेला चौथा शनिवारी आणि २६ तारखेला रविवारी बँका बंद राहतील.