लोकप्रिय संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या ६९व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ते गेल्या एक वर्षापासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) आणि छातीतील संसर्गाने त्रस्त होते. हाच आजार त्यांच्या निधनाचे कारण ठरला आहे. जाणून घेऊया, ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय आहेत.
ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया म्हणजे काय?
ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया हा झोपेसंबंधित श्वसनाचा एक आजार आहे. यामुळे झोपेच्या वेळी अनेकदा श्वासोच्छवास बंद होतो. परंतु याबद्दल रुग्णाला जराही कल्पना नसते. झोपेत श्वासोच्छवास बंद होण्याचा हा त्रास काही सेकंद ते १ मिनिटपर्यंत जाणवू शकतो. श्वसनासंबंधी या त्रासामुळे रुग्ण अनेकदा झोपेतून जागा होतो. परंतु एक किंवा दोन दीर्घ श्वास घेतल्यानंतर सर्व ठीक होते. एका रात्रीत असे पाच ते ३० वेळा होऊ शकते. सतत जाग आल्याने रुग्णांची झोप पूर्ण होत नाही. याच कारणामुळे या आजारानेग्रस्त असलेले रुग्ण संपूर्ण दिवस जांभई देत असतात. अशा लोकांना, त्यांना रात्री नीट झोप लागत नाही हे कळतही नाही.
स्लीप एपनियाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया हा यातील एक सामान्य प्रकार आहे. यात झोपेच्या वेळी घशाचे स्नायू सैल होतात. या आजारात श्वसनमार्गाच्या वरच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने हवेचा प्रवाह नीट होऊ शकत नाही. श्वासोच्छवासात दीर्घकाळ व्यत्यय आल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.
ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनियाची लक्षणे :
- दिवसा खूप झोप येणे.
- जोरजोरात घोरणे.
- झोपेच्यावेळी श्वासोच्छवास थांबल्याचे जाणवणे.
- अचानक गुदमरल्याने जाग येणे.
- तोंड सुकणे आणि घशात खवखव जाणवणे.
- सकाळी डोकेदुखी जाणवणे.
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- मूडमध्ये बदल आणि नैराश्य
- उच्च रक्तदाब
- लैंगिक इच्छा कमी होणे
वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.