आजच्या फास्टफूडच्या जमान्यामध्ये आयोडिनची पर्वा कुणाला आहे. जिभेचे चोचले पुरविले म्हणजे झाले. लहान मुलांचे पिझ्झा-बर्गर देऊन हवे तसे लाड करणाऱ्या पालकांनो सावधान.. तुमच्या मुलाच्या आरोग्याच्या तक्रारी यातूनच पुढे निर्माण होणार आहेत. शरीरात पुरेसे आयोडिन जाते की नाही हे पाहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा गलगंड, शरीराची वाढ खुंटणे आणि थायरॉइडच्या समस्यांपासून अनेक व्याधी उद्भवण्याचा धोका आहे.
जगभरात आयोडिन न्यूनता विकाराचे दोनशे कोटींहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच २१ ऑक्टोबर हा ‘जागतिक आयोडिन न्यूनता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतातही आयोडिन न्यूनतेची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र शासनाने १९६२पासून राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कायक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. १९९२ मध्ये राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाचे नाव बदलून ‘राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रम कार्यक्रम’ असे करण्यात आले.
भारतात जवळपास साडेसात कोटी लोकांमध्ये आयोडिनची कमतरता आढळून आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे एक कोटी तीस लाख लोकांमध्ये आयोडिनची कमतरता आढळून आली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश व बिहारमध्ये सुमारे ८२ लाख लोकांमध्ये कमतरता आहे. महाराष्ट्रात जवळपास ६२ लाख लोकांमध्ये आयोडिनची कमतरता असून गुजरातमध्ये हेच प्रमाण ४२ लाख एवढे आहे. खरेतर ही गोष्ट साधीशी आहे. शरीराला पुरेसे आयोडिनयुक्त मिठ मिळाले की हा प्रश्न सहज सुटणारा आहे. साधारणपणे १५० मायक्रोग्रॅम आयोडिनची शरीराला दररोज गरज असते. महाराष्ट्रात हा आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम जोरात राबविला जातो. यासाठी गलगंड रुग्णांची शोधमोहीम राबविली जाते. आदिवासी भागात स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे व अर्भक मृत्यू रोखण्यासाठी आयोडिनयुक्त मिठाच्या पाकिटांचे वाटपही केले जाते. मिठाच्या नम्युन्यांची तपासणी तसेच ज्या भागात याचा प्रादुर्भाव आहे तेथील लोकांच्या लघवीचे नमुनेही आरोग्य विभागाकडून तपासण्यात येतात.
प्रश्न आहे तो शहरातील फास्टफूड जमान्यात राहणाऱ्या लोकांचा.. भविष्यातील आरोग्याचा विचार करून शरीराला पुरेसे आयोडिन कसे मिळाले, याची काळजी खाण्या-पिण्यातून घेण्याची गरज आहे. गर्भधारणेनंतर मातेच्या शरीरात पुरेसे आयोडिन नसेल तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकूणच गलगंड, थायरॉईड, वाढ खुंटणे, गर्भारपणात माता व बाळाचे आरोग्य जपायचे असेल तर पुरेशा सकस आहाराबरोबरच आयोडिनचा समतोलही राखणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा