करोना महामारीच्या दरम्यान रेल्वेकडून तिकीट कन्फर्म झाल्यानंतरच प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट बुक करून आणि ती कन्फर्म झाल्यानंतरच प्रवास करता येणार आहे. तथापि, काही सवलतींमध्ये आता प्लॅटफॉर्मवरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल. काही लोक त्यांच्या मोबाईल किंवा इतर डिव्हाईसवरून आगाऊ रेल्वे तिकीट बुक करतात तर काही लोक प्रवासासाठी दलालांसोबत संपर्क साधतात. अशातच, भारतीय रेल्वे आयआरसीटीसीने प्रवाशांनी बेकायदेशीररित्या तिकीट बुक न करण्याचा इशारा दिला आहे.
हे दलाल तिकीट बुकिंगच्या नावावर प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारतात. तसेच अनेकदा चुकीचे तिकीट सुद्धा देतात. या गोष्टीचा विचार करून रेल्वेने याबाबत सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच पश्चिम रेल्वेने अवैध पद्धतीने तिकीट बुक करणाऱ्या आणि प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई सुरु केली आहे. पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलांतर्फे सहा मंडळांमध्ये प्रत्येक दिवशी विशेष मोहीम चालवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनी देखील या गोष्टीपासून सावध राहावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय.
आता NPS नाही तर OPS अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन पर्याय; जाणून घ्या तपशील
२.१५ कोटींची ई-तिकिटे केली जप्त
पश्चिम रेल्वेद्वारे आतापर्यंत जवळपास २.१५ किती रुपयांची ई-तिकिटे आणि यात्रा-सह-आरक्षण तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘या कामासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली असून ही टीम जागोजागी याची तपासणी करत आहेत. समोर आलेल्या प्रकरणांमध्ये असे निदर्शनास आले की अनेक बनावट दलाल आहेत जे बनावट पद्धतीने तिकीट बनवून विकत आहे. तसेच तात्काळ किंवा इतर प्रवासासाठी लोकांकडून अधिक पैसे घेत आहेत. यात अधिकृत आयआरसीटीसी दलालांचा देखील समावेश आहेत. या दलालांनी तिकीट काढण्यासाठी बनावट आणि अवैध गोष्टींचा वापर केला.
बनावट तिकीट आढळल्यास काय कारवाई होणार
जर असे बनावट तिकीट आढळले तर त्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे तिकीट जप्त केले जाते आणि त्याचे पैसेही दिले जात नाहीत. यानंतर या तिकीटावर प्रवास करता येणार नाही. सोबतच संबंधित प्रवाशाला दंड देखील भरावा लागेल. म्हणूनच रेल्वेकडून, लोकांना दलालांकडून तिकीट बुक करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
अवैध पद्धतीने तिकीटांची विक्री करणाऱ्या दलालांवर ‘ही’ कारवाई होणार
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा लोकांवर कलम १४३ च्या कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई केली जाते. या दलालांकडून केवळ दंड वसूल केला जातो. त्यांच्यावर आयपीसी कलम लागू होत नाही. मात्र, हा दंड अधिक घेतला जेणेकरून येणाऱ्या काळात तो पुन्हा हे काम करणार नाही.