आजकाल या फॅशन आणि ट्रेंडच्या या जमान्यात सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले जातात. परंतु, अनेकदा चेहरा ब्लीच केल्यानंतर आपण अशी चूक करून बसतो, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते. चेहरा उजळण्यासाठी, नको असलेल्या केसांचा रंग हलका करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ब्लीचचा वापर केला जातो. पण ब्लीच केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारच्या समस्या होणार नाहीत.
चेहऱ्याला तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची केमिकल उत्पादने आहेत. पार्लरमध्ये फेस पॅकपासून ते ब्लीचपर्यंतचा वापर केला जातो, परंतु ते वापरल्यानंतर माहितीच्या अभावामुळे लोक काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम त्यांच्या त्वचेला नंतर भोगावा लागतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की ब्लीचनंतर छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन चेहरा सुधारण्यासोबतच तुम्ही त्वचेचे रक्षणही करू शकता.
त्वचेची ऍलर्जी:
ब्लीचमुळे त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. वास्तविक, ब्लीचिंग हे एक प्रकारचे रासायनिक उत्पादन आहे. रसायने तुमच्या त्वचेला फायदा कमी आणि जास्त नुकसान करतात. अशा परिस्थितीत, त्याच्या वापरामुळे, काही महिलांच्या त्वचेवर खाज सुटणे, लाल रंगाचे डाग पडणे, जळजळ आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.
ब्लीच केल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवा-
ब्लीचिंग केल्यानंतर घरातच रहा –
ब्लीचिंग केल्यानंतर उन्हात जाणे टाळा, कारण सूर्यप्रकाशामुळे तुमच्या त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळे, ब्लीचिंगनंतर काही तास घरीच राहणे तुमच्यासाठी उत्तम आहे.
फेस वॉश वापरणं टाळा –
अनेक महिला ब्लीच केल्यानंतर लगेचच फेसवॉशने चेहरा धुतात. ब्लीचिंगनंतर लगेच फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यास ब्लीचचा प्रभाव नाहीसा होतो. त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लीच काढण्यासाठी नेहमी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करावा. गरम पाणी वापरल्याने पुरळ उठण्याचा धोका असतो.
स्क्रब करू नका –
डेड स्किन किंवा ब्लॅकहेड्स सारख्या समस्यांवर स्क्रब हे तुमच्या स्किन केअर रूटीनचा एक मुख्य भाग आहे. पण ब्लीच लावल्यानंतर स्क्रब करू नका. यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. जर स्क्रबिंग करायचे असेल, तर तुम्ही ब्लीच लावण्यापूर्वी वापरू शकता.