लांब आणि मजबूत नखं असणं हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. सौंदर्य खुलवण्यासाठी बऱ्याचजणींना नखं वाढवण्याची हौस असते. पण जर तुमचा आहार संतुलित नसेल तर नखं लवकर ठिसूळ होतात आणि नखांची वाढही खुंटते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची नखं लांब आणि मजबूत असावी असं वाटत असेल तर त्यांची योग्य निगा राखणं गरजेचं आहे. नखे तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. ही नखे तुटू नयेत म्हणून काही खास घरगुती टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
नारळाचे तेल
नारळाच्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते जे नखांना पोषण देण्यासाठी उपयुक्त आहे. हे कमकुवत नखे तुटण्यास प्रतिबंध करते. हे नखांना संसर्गापासून देखील वाचवते. तर नखांना मजबूत करण्यासाठी तुम्ही एका वाटीत नारळाचे तेल कोमट करून घ्या. त्यानंतर हे तेल नखांना लावून नखांची मालिश करा. दररोज १० मिनिटे मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि नखे मजबूत होतात.
व्हिटॅमिन ई तेल
व्हिटॅमिन ई हे तुमच्या नखांना मजबूत आणि हायड्रेटेड बनवते. याने नखे लवकर तुटत नाही. आता नखांना व्हिटॅमिन ई युक्त असलेले तेल वापरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला नारळाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि नंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता या तेलाने नखांना मसाज करा. दररोज नखांवर मसाज करा.
मीठ
नखांना मजबूत करण्यासाठी आणि लवकर वाढवण्यास मीठ उपयुक्त आहे. आता नखांना मजबूत करण्यासाठी मिठाचा वापर कसा केला जातो? तर तुम्हाला सर्वात प्रथम २ चमचे मीठ कोमट पाण्यात घालून त्यात नखे बुडवा. तसेच या पाण्यात लेमन एसेंशियल ऑइलचे २ थेंब पाण्यात मिसळा आणि नखे १० मिनिटे बुडवून ठेवा. काही वेळाने हात स्वच्छ करून त्यांना क्रीम लावा. असे नियमित केल्याने तुमची नखे लवकर तुटणार नाही.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून, ते नखांसाठी खूप उपयुक्त आहे. हे तुमच्या नखांना तुटण्यापासून रोखते आणि त्यांना सुंदर बनवते. नखे सुंदर दिसण्यासाठी व त्यांना तुटण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून ते कोमट करा आणि या मिश्रणात काही वेळ नखे बुडवून ठेवा. आता याने नखांना मसाज करा आणि रात्रभर असेच राहू द्या. असे केल्याने नखांना व्हिटॅमिन सी हे पोषण मिळते,आणि नखांची वाढ होते.