राज्यात करोना काळात अनेक शाळा बंद होत्या. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मात्र आता वर्ष 2022 च्या इयत्ता बारवीच्या परीक्षा (12th Exams 2022) होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
या वेबसाईटद्वारे करा अर्ज
बारावी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन http://mahahsscboard.in अर्ज करायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर १३ डिसेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
अर्ज करण्याचा कालावधी
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसायिक अभ्यासक्रम (vocational Course) शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनरपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी खासगी आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २० डिसेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करु शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.