चालण्याचा व्यायाम सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे असे म्हटले जाते. तुम्ही काम करुन कंटाळला असाल आणि तुम्हाला थोडा आराम हवा असेल तर चालणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. चालण्यामुळे विविध कारणांनी निर्माण होणारा ताण कमी होण्यास मदत होते. मधुमेही, लठ्ठ व्यक्ती तसेच इतर हाडांशी निगडीत आजार असणाऱ्यांनाही चालण्यास सांगितले जाते. आता हे सगळे खरे असले तरीही नेमके कोणत्या वेळेला चालावे? विशिष्ट वेळेला चालण्याचे फायदे कोणते अशा गोष्टींवर चर्चा करण्यात येते. सकाळच्या फ्रेश हवेत चाललेले जास्त चांगले असे काही जण म्हणतात. सकाळचीच वेळ चालण्यासाठी उत्तम असते असा गैरसमजही अनेकांमध्ये असतो. याशिवाय काही जण जेवण झाल्यावर चालल्याचा जास्त फायदा होतो असे म्हणतात. पण या सगळ्या वेळांमध्ये संध्याकाळी चालण्याचेही अनेक फायदे असल्याचे शिवानी दिक्षित यांनी सांगितले आहे. पाहूयात काय आहेत हे फायदे…
आरोग्यासाठी उपयुक्त
दैनंदिन आयुष्यात व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. सकाळी ऑफीस, कॉलेज आणि इतर कामांमुळे व्यायामाला वेळ होईलच असे नाही. अशावेळी संध्याकाळी केलेला व्यायामही निश्चितच उपयुक्त ठरु शकतो. यामुळे नेहमीच्या कम्फर्टमधून बाहेर येऊन कॅलरीज जाळायला मदत होते.
शांत झोप लागण्यास फायदेशीर
रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी असे आपल्याकडे सांगितले जाते. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज संध्याकाळी चालण्याचा व्यायाम केलात तर तुमचे डोके शांत होते. त्यामुळे वर्कआऊट करण्यासाठी शरीर तयार होते. चालल्यामुळे तुम्ही थोडे दमता आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते.
डोके हलके होण्यास उपयुक्त
दिवसभर ऑफीस आणि इतर कामांमुळे आपल्यातील अनेक जण अक्षरश: थकून गेलेले असतात . प्रत्येकालाच स्वत:साठी थोडा वेळ द्यावा असे वाटत असते. चालण्याच्या व्यायामामुळे हे शक्य होते आणि आपण स्वत:साठी थोडा वेळ देऊ शकतो. एकटेच असल्याने आपल्याला स्वत:साठी मोकळा वेळ मिळणे यामुळे शक्य होते.
पाठीचे दुखणे थांबण्यास मदत
आपल्यातील अनेक जण दिवसातील बराच काळ ऑफीसमध्ये खुर्चीत किंवा प्रवासादरम्यान बसून असतात. त्यामुळे पाठ, मान यांचे दुखणे उद्भवते. अशावेळी जर तुम्ही संध्याकाळी चालण्याची सवय ठेवली तर ते निश्चितच तुमच्या फायद्याचे ठरु शकते. यामुळे तुमचे पोश्चर बदलण्यासही निश्चितच मदत होते.
पचनक्रियेसाठी उपयोगी
संध्याकाळी चालण्याची सवय ठेवल्यास दिवसभर खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचण्यास मदत होत. पोटातील क्रिया चालण्यामुळे योग्य पद्धतीने पार पडतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. म्हणून संध्याकाळी लवकर खाऊन त्यानंतर अर्धा तासाने ठराविक वेळ चालावे. त्याचा निश्चितच फायदा होतो.