मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरण्यात येणारा प्रत्येक पदार्थ हा चवीसोबतच विशिष्ट गुणधर्मासाठीही ओळखला जातो. यामध्येच सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ म्हणजे वेलची. अनेक वेळा वेलची चहामध्ये किंवा एखाद्या गोड पदार्थाची चव वाढविण्यासाठीही वापरली जाते. परंतु, तिच्या या गुणधर्माव्यतिरिक्त तिच्या अन्यही काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत, जे शरीरासाठी आवश्यक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात वेलचीचे फायदे.
१. ज्यांनी प्रवासात उलटी होते किंवा मळमळ सुटते अशा व्यक्तींनी वेलचीचे दाणे चघळावेत.
२. एखाद्या वेळेस उचकी लागली आणि ती थांबत नसेल तर वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण करावे हे चूर्ण घेतल्यास उचकी थांबते.
३. लघवीतून व योनीतून रक्तस्राव होत असल्यास वेलची चूर्णाचा लगेच उपयोग होतो.
४.दरुगधी जखमांवर वेलची चूर्ण व तूप किंवा खोबरेल तेलाची पट्टी ठेवावी. जखम लवकर भरून येते.
५.पोटफुगी या विकारात वेलची दाणे हिंगाबरोबर मिसळून खावे.
६.वेलची मूत्रप्रवृत्ती साफ करते. त्याकरिता डाळिंब किंवा दह्याबरोबर वेलची चूर्ण खावे.
७. वेलची अत्यंत पाचक आहे. जडान्न, तुपाचे अजीर्ण, सतत ढेकर येणे याकरिता तीन-चार वेलदोडे दोन कप पाण्यात उकळून अष्टमांश काढा करून प्यावा.
८.कोणत्याही पदार्थात सुगंधी म्हणून वेलचीचा जसा वापर आहे तसेच शरीरात थंडावा आणण्याकरिता वेलची सर्वत्र वापरावी.
९.गर्भवती स्त्रीने वेलची फार खाऊ नये.
(कोणतेही उपाय करुन पाहण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)