जगभरात इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून भारतातही या गाड्यांना पसंती मिळत आहे. जगभरातील वाढतं प्रदुषण, पेट्रोलचे वाढते दर तसंच इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्र सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन अशा अनेक कारणांमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर जास्त भर दिला जात आहे. सध्या अनेक कार कंपन्या भारतात इलेक्ट्रिक वाहने दाखल करण्याच्या तयारीत आहेत. हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक गाडय़ांच्या किमती सामान्य गाडय़ांच्या तुलनेने जास्त आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहक इच्छा असूनही या वाहनांकडे कमी वळतोय. पण भारतात इलेक्ट्रिक गाडय़ांच्या बाजारासाठी चांगले दिवस येणार असल्याचे दिसत आहे. आता बऱ्याच मोठय़ा कंपन्यांनी येत्या वर्षांमध्ये इलेक्ट्रिक गाडय़ा बाजारात असणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या कार खरेदीवर 12 हजार रुपये ‘पोल्यूटर पे’ म्हणजेच प्रदूषण शुल्क आकारण्यासाठी नियम बनवत आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढावा या दृष्टीने हे पाऊल उचललं जाणार आहे. वर्ष 2018 मध्ये अशाच काही इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या असून या कार अनेकांना आकर्षित करतायेत. जाणून घेऊया 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या काही इलेक्ट्रिक कार्सवर –
मारुती सुझुकी टोयोटासह इलेक्ट्रिक गाडी दाखल करणार आहे. ती म्हणजे भारतीय ग्राहकांची लाडकी वॅगन आर. नाव वॅगन आर जरी असले तरी ही भारतात मिळणारी वॅगन आर नसून जपानमध्ये विकली जाणारी वॅगन आर असणार आहे. सध्या या गाडीच्या भारतभर चाचण्या सुरू आहेत. ही गाडी २०२० मध्ये बाजारात दाखल केली जाणार असल्याची माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे. गाडीत १४ वॉट बॅटरी असण्याची शक्यता आहे.
टाटा निओ ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. दिसायला टाटा नॅनोप्रमाणेच असणारी निओ शहरात प्रवास करण्याच्या उद्देशाने तयार केली आहे. त्यानंतर टाटा टीगोरचे इलेक्ट्रिक संस्करण बाजारात दाखल होणार आहे. ह्युंदाईची आयोनिक ही तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे. एक इलेक्ट्रिक दुसरी, हायब्रीड आणि तिसरी प्लग इन हायब्रीड. अशा पर्यायांमध्ये येणाऱ्या या गाडीची विक्री भारतात पुढील वर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Renault Zoe EV
ऑटो एक्सपो 2018 मध्ये Renault ने आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक Renault Zoe EV सादर केली. 41kWh बॅटरीवर चालणारी ही कार एकदा चार्ज झाल्यावर 400 किलोमीटर पर्यंतचं अंतर कापू शकते. तर संपूर्ण बॅटरी चार्ज करण्यासाठी केवळ 65 ते 80 मिनिटांचा वेळ लागतो.
महिंद्रा ई20 प्लस
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 19 किलोव्हॅटची पावरफुल मोटर आहे. या मोटरच्या मदतीने ही कार 26bhp पावर आणि 70nM टॉर्क जनरेट करते. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही कार 110 किलोमीटर पर्यंतचं अंतर कापू शकते. बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी एक तास आणि 12 मिनिटांचा वेळ लागतो.
महिंद्रा ई व्हेरिटो –
महिंद्राची ही दुसरी इलेक्ट्रिक सिडान कार आहे. यामध्ये पाचजण बसू शकतात. मात्र, या कारचा टॉप स्पीड केवळ 86 किलोमीटर प्रतितास आहे. तर 91nM चा टॉर्क या कारच्या मोटरद्वारे जनरेट होतो.
टाटा टिगोर इलेक्ट्रिक –
टाटाची ही कार देखभालीसाठी लागणाऱ्या कमी खर्चामुळे चांगला पर्याय ठरु शकते. टाटा टिगोर ई व्ही ही २१६ ए एच १६ व्ही बॅटरी आणि ३ फेज एसी इंडक्शनसह असून ३९.९५ हॉर्स पॉवरची क्षमता आहे. डिझाइनच्या बाबतीत ही कार कॉम्पॅक्ट सिडान प्रमाणेच आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 120 किलोमीटरचं अंतर कापते. सध्या या कारसाठी टाटा कंपनी आणि ‘झूम कार’मध्ये करार झाला असून पुण्यात ही कार भाडेतत्त्वावर उपलब्ध आहे. किंमत : १०-११ लाख रुपये.
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक
कोनाचे एसयुव्ही मॉडेल भारतात दखल होणार असून इलेक्ट्रिक पॉवर मॉडेलदेखील पुढील वर्षी येणार आहे. या गाडीची प्रवास क्षमता ३९० किमी असणार असून हे गाडीचे मुख्य वैशिष्टय़ मानले जाते. किंमत : २२ लाख रुपये.
निस्सान लीफ
लीफचे सध्याचे मॉडेल दोन बॅटरीच्या ताकदीने २२८ किमीचा प्रवास करते. नवीन मॉडेल यामध्ये या बॅटरीची क्षमता वाढवली जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारासाठी या गाडीत बदल केले जाण्याची शक्यता आहे. किंमत : २० लाख रुपये.