दिव्यांच्या झगमगाटात साजरा केला जाणारा दिवाळी हा सण सगळ्यांच्याच आवडीचा असतो. पाच दिवस अत्यंत उत्साह आणि आनंदात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीमध्ये फराळाची रेलचेल, घरात पाहुण्यांची ये-जा आणि सगळ्यांसोबत मिळून फटाके उडवण्याची मजा ही काही औरच असते. या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे दिवाळीची सजावट. दिवाळीच्या सजावटीत कंदील, रांगोळी व दिव्यांचा वापर सगळे करतात आणि तरीही प्रत्येक घर हे इतर घरांपेक्षा वेगळं दिसतं. मग कधी त्यात पारंपरिक कंदील लावण्याऐवजी नव्या धाटणीचा कंदील लावलेला असतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या दिव्यांच्या माळांनी घर उजळलेलं दिसतं.
आपण कितीही इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावल्या तरी आपल्या नाजूक अशा पणतीची गोष्टच वेगळी आहे. तुम्ही बाहेर बघितलं, तर मातीच्या लहान-मोठ्या पणत्यांपासून काचेच्या, प्लास्टिकच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या पणत्या दिसतील. पण, अशा सुंदर पणत्या जर तुम्हाला घरात टाकाऊ गोष्टींपासून बनवता आल्या तर? त्यामुळे दिवाळीची सजावटही सुंदर होईल आणि नको असलेल्या वस्तूंचाही वापर होईल. अशा टाकाऊपासून टिकाऊ पणत्या कशा बनवायच्या हे @thekaurartofficial या इन्स्टाग्राम हॅण्डलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे.
हेही वाचा : DIY : दिवाळीत कंदिलाची शोभा वाढवतील हे ‘मिनी कंदील’; फक्त या तीन गोष्टी वापरून बनवा…
टाकाऊपासून टिकाऊ पणती
१. घरातील जुने झालेले प्लास्टिकचे चमचे घ्या. त्यांचे मधोमध तुकडे करून, खाण्यासाठी वापरला जाणारा भाग बाजूला ठेवा.
२. एक वर्तमानपत्र घेऊन, त्यावर चमच्यांचे तुकडे ठेवा आणि त्यावर सोनेरी रंगाने स्प्रे-पेंट करा. अशा पद्धतीचा रंग वापरल्याने तो प्लास्टिकच्या चमच्यावर व्यवस्थित बसतो.
३. पुठ्ठा/ कार्डबोर्ड पेपरचा एक गोलाकार तुकडा कापून घ्या. त्यावर रंगवलेले चमचे चिकटवा. चिकटवलेल्या चमच्यांवर उरलेल्या चमचे चिकटवा. त्यामुळे त्याला एखादा फुलाचा आकार आल्यासारखे दिसेल. चमचे चिकटवताना पुठ्ठा / कार्डबोर्डचा मधला भाग मोकळा ठेवा.
४. चिकटवलेल्या सोनेरी चमच्यांवर पांढऱ्या रंगाचे मोती चिकटवा.
५. पुठ्ठ्याच्या/ कार्डबोर्डच्या मध्यभागी मोकळ्या ठेवलेल्या जागेत मेणबत्तीच्या दिव्यांसाठी वापरला जाणारा स्टॅण्ड ठेवून, त्यामध्ये मेणबत्तीची छोटी पणती लावा.
मग तयार होईल तुमची टाकाऊपासून तयार झालेली टिकाऊ आणि सुंदर पणती. @thekaurartofficial या इन्स्टाग्राम हॅण्डलने दिवाळी सजावटीचे असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.