नीरज राऊत
महाराष्ट्र हा निसर्गाने नटलेला आहे. राज्यातील प्रत्येक जिह्यात निसर्ग सौंदर्याची खाण आहे. तेथे गेलात तर नक्कीच ती पाहायला मिळते. असेच पालघर जिह्यातील जव्हार हे शहर. थंड हवेचे ठिकाण म्हणून त्याची ओळख दाखवताना त्याला महाबळेश्वर, मिनी माथेरानही संबोधले जाते. ठाणे, मुंबई, नाशिक, गुजरातपासून जवळच्या अंतरावर असलेले पालघर जिल्ह्यातील जव्हार हे पर्यटन स्थळ. त्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आलेले आहे. दाही दिशांना असलेली हिरवीगार झाडी, उंचावर वसलेले हे शहर, नागमोडी रस्ते आणि तेराव्या शतकातील अजिंक्य संस्थान असलेले शहर. जरी ते शहर असले तरी ते निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघालेले आहे. शहर विकसित होत असताना येथील निसर्गाला कोठेही तडा गेलेला नाही.
राजवाडे, भुईकोट किल्ले, डोंगर, टेकड्या तसेच आदिवासी संस्कृती, परंपरा, वारली चित्रकलेचा वारसा लाभलेल्या या लहानशा पण टुमदार शहराकडे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. देश-विदेशातील पर्यटकांची भटकंती येथे वर्षभर पाहायला मिळत असते. जव्हारच्या या संस्थानकालीन पुरोगामी सुधारक विचारांचा पगडा इथल्या नागरिकांवर आजही आहे
आकाश निरभ्र असलं की जव्हारच्या पठारावरून दिसणारा संतोषीमाता डोंगराचा डहाणूजवळील सुळका बघत राहावा असा आहे. पावसाळा ते हिवाळा म्हणजे जव्हारवर निसर्गाने मुक्तहस्ते केलेली उधळण. धुकं, हिरवाई आणि धबधबे असलेलं गाव कुणाला पाहायचं असेल तर जव्हारला नक्कीच भेट द्यावी.
अप्रतिम भुईकोट किल्ला भोपतगड जव्हारपासून १२ किमी अंतरावर वाडा तालुक्याच्या सरहद्दीला लागून आहे. किल्ल्यावर शिवकालीन बांधलेली कुंडे वर्षभर पाण्याने भरलेली असतात. जव्हारच्या मुकणे राजांचा वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस हा भव्य राजवाडा जव्हारला लागूनच दिमाखात उभा आहे. अनेक चित्रपट, टी.व्ही. मालिकांचे चित्रीकरण या राजवाड्यात होत असते.
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली टेकडी म्हणजे शिरपामाळ टेकडी. सुरतेवर छापा टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जव्हारच्या रस्त्याने जात असताना या टेकडीवर महाराजांनी शिरचेप देऊन जव्हारच्या राजांचा सन्मान केला होता. तेव्हापासून या टेकडीचे नाव शिरपामाळ असे पडले. जव्हारच्या राजाच्या मदतीने शिवाजी महाराज गंभीरगड मार्गे सुरतेवर छापा टाकण्यात यशस्वी झाले होते. शहराला धाकटी जेजुरी असे संबोधण्यात येते. जव्हार संस्थानचे आराध्य दैवत खंडोबा मंदिर जव्हार शहराला लागूनच आहे. दरवर्षी खंडोबा उत्सव भरत असतो. शहरात विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर, महादेव मंदिर अशी मंदिरे बांधलेली आहेत. ती पुरातन आहेत.
जव्हार शहर हे ह्यधबधब्यांचे शहरह्ण असेही ओळखले जाते. पावसाळा सुरू झाला की मुसळधार पडणारा पाऊस आणि ओसंडून, खळखळून वाहणारे धबधबे हे या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य! जव्हारपासून १३ किमी अंतरावर जव्हार – सेलवास मुख्य रस्त्याला लागून दाभोसा गावालगत सुप्रसिद्ध असा ह्यदाभोसा धबधबाह्ण आहे. पावसाळ्यात विशेष करून कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारा पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी असते. काळमांडवी धबधबाही तसाच निसर्गप्रेमींना खुणवत असतो. हिरडपाडा, वंदारो असे अनेक लहान-मोठे धबधबे हेही तितकेच पाहण्याजोगे आहेत.
हनुमान पॉइंट या उंचावर असलेल्या टेकडीवरचा पूर्वेचा सूर्योदय तर पश्चिमेला असलेला ‘सनसेट पॉइंट’ ला सूर्यास्ताचा बहर पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात. शहर हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंचावर वसलेले असल्याने येथे पावसाळ्यात धुके पाहण्यासारखे असते.
येथील छोटाशा असलेल्या भूपतगडाला उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असे दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झाले आहेत. प्रवेशद्वारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरून उभे आहेत. प्रवेशद्वारापाशी एक म्हसोबाची मूर्ती असून, आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. माथ्यावर असलेल्या मोठ्या पडक्या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडावर चार पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास केवळ अर्धा तास लागतो. गडावरून त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा परिसराचे दर्शन होते.
शहराच्या पिकवसी जाणारी नागली (नाचणी), वरई व उडीद यांना बाहेरून खूप मागणी आहे. आदिवासीबहुल असलेल्या या शहरात तारपा चौक, बिरसा मुंडा चौक, राजे यशवंत प्रवेशद्वार, स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी प्रवेशद्वार असे नामकरण झालेले पाहावयास मिळते. सण, उत्सवाच्या वेळी जव्हारच्या पंचक्रोशीत तारपा नृत्य, ढोल नृत्य, पावरी नृत्य, घांगळी नृत्य अशा अनेक जगप्रसिद्ध नृत्यांचा आनंद घेता येतो.
कसे जाल?
● जवळचे रेल्वे स्थानक : इगतपुरी किंवा नाशिक (मध्य रेल्वे.), डहाणू (पश्चिम रेल्वे)
● इगतपुरी- जव्हार : ६१ कि.मी.
● नाशिक- जव्हार : ८० कि.मी.
● डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.
● मुंबई-जव्हार (कसारा मार्गे) : १८० कि.मी.
nirajraut2023 @gmail. com