फिरायला जायची बहुतेकांची ठिकाणं ठरलेली असतात आणि चुकूनही फारसं कुणी खान्देश बघायला जात नाही. पण खरंच वेगळं काही अनुभवायचं असेल तर या खान्देशात बरंच काही आहे.

महाराष्ट्रात फिरायला कुठे कुठे जाता येईल, याची यादी सहजच काढली जाते, तेव्हा त्यात खान्देशाची नोंद क्वचितच घेतली जाते. त्यामुळे धुळे, नंदुरबार हे तसे उपेक्षित जिल्हे आहेत, असे जाणवते. जळगाव तरी चच्रेत असते. पण ‘चला, या सुट्टीत धुळ्याला फिरायला जाऊ’, असे कोणी म्हणताना सहसा दिसत नाहीत. त्यात तिथे उन्हाळा प्रचंड असतो. त्यामुळे, लोकांच्या मे महिन्याच्या सुट्टीतूनदेखील इतक्या उकाडय़ाचा प्रदेश बाद होतो.

jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Muharram is celebrated without any Muslim family in the village where Maruti and Jyotiba temples are located
तळटीपा: गोदाकाठ ते गंगौली !
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
second phase of Taliye rehabilitation will be completed in June
तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा

धुळे, नंदुरबार हे महाराष्ट्राचे उत्तरपश्चिम टोक म्हणावे लागेल. गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमा इथून जवळ आहेत. त्यामुळे, हे दोन्ही जिल्हे पश्चिम खान्देश म्हणून ओळखले जातात. जळगावचा भाग हा पूर्व खान्देश आहे. पश्चिम खान्देशात अहिराणी बोलली जाते. तर पूर्व खान्देशात वऱ्हाडी. नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा झालेला आहे. ‘खान्देश’ असा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा त्यात महाराष्ट्रातले धुळे, नंदुरबार, जळगाव हे तीन जिल्हे येतातच, पण मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरचा भागदेखील त्यात येतो. कृष्णाचा ‘कान्हदेश’ अशीही एक व्युत्पत्ती मानली जाते. खरेतर, महाराष्ट्राच्या इतर भागातून उत्तर भारताकडे जायचा मार्गच खान्देशातून जातो. त्याअर्थी ते उत्तरेकडचे प्रवेशद्वारच! बुलडाणा, औरंगाबाद आणि नासिक असे तीन जिल्हे खान्देशच्या सीमेवर आहेत. जालना जिल्ह्यचा काही भागदेखील जळगावच्या जामनेरजवळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यतली अजिंठा लेणी जळगावपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर आहेत. नासिकच्या बाजूने सटाणा ओलांडले की खान्देश सुरू होतो. ताहराबादजवळचे मांगी तुंगी डोंगर आणि साल्हेर मुल्हेर डोंगर ओलांडले की सह्यद्री पर्वतरांगा संपून सातपुडय़ाचा भाग सुरू होतो, असे ढोबळमानाने म्हणता येईल. मांगी तुंगी हे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खान्देशच्या सीमेवरच आहे.

सर्वसामान्य माणसे फिरायला जातात, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, किती दिवस लागतील इकडे फिरायला? आपल्याकडे बरेचसे पर्यटन हे तीर्थक्षेत्रीदेखील होते. त्यामुळे, फिरणे म्हणजे केवळ धार्मिक स्थळांना भेट देणे, अशी काहींची समजूत असते. पण एखादा प्रदेश नीट जाणून घेणे, त्याची भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक माहिती मिळवून फिरणे, तिथली खाद्य संस्कृती, लोकजीवन जाणून घेणे, असेदेखील फिरणे वाढत चालले आहे. नासिकमाग्रे खान्देशात जाताना दोन-तीन पर्याय आहेत. मुंबई आग्रा रस्त्याला नासिकपासून साधारण पंचावन्न किलोमीटरवर चांदवडच्या अलीकडे सोग्रस फाटा आहे. इथून भाबडबारी घाट ओलांडून सटाण्यातून मांगी तुंगी करत दहिवेलमाग्रे नवापूर अथवा दहिवेल-साक्री आणि धुळे असे जाता येते. नासिक सटाणा अंतर नव्वद किलोमीटर आहे. ताहीराबादजवळ हरणबारी धरण आहे. हा परिसर पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो. उद्धव महाराज समाधी ही जुनी वास्तूदेखील या परिसरात आहे.

नासिकहून मुंबई-आग्रामाग्रे थेट धुळ्यात जाता येते. या वाटेतदेखील बरीच आकर्षणे आहेत. नासिक-धुळे हे अंतर एकशे साठ किलोमीटर आहे. नासिक-धुळे रस्त्यावर चांदवडच्या अलीकडे धोडांबे नावाचे गाव चांदवड तालुक्यात येते. धोडांबे हे सोग्रस फाटय़ाच्या अलीकडे असलेल्या वडाळीभोईपासून हायवेला डावीकडे वळून साधारण आठ ते दहा किलोमीटर आत आहे. नासिक वडाळीभोई अंतर पन्नास किलोमीटर आहे. धोडांबेला हेमाडपंथी शिवालय आहे. या मंदिराला चक्क समोरील बाजूने प्लास्टर करून टाकले आहे. बटबटीत ऑइल पेंट दिलेले आहेत. पण मागील बाजूने कोरीव काम छान बघता येते. या मंदिराचे नीट जतन करायला हवेय. गाव तसे देखणे आहे. दर मंगळवारी अगदी मंदिराच्या जवळच या गावात बाजार भरतो. इथून तीन किलोमीटरवर ‘हट्टी’ नावाचे गाव आहे. तिथला खवा प्रसिद्ध आहे. नासिकमधील अनेक हलवाई इथून खवा आणतात. धोडांबे चांदवड तालुक्यात आहे. पण याच्याशी मिळतेजुळते नाव असलेला आणि कळसुबाई, साल्हेरनंतर तिसऱ्या क्रमांकाचा उंच असा ‘धोडप’ किल्ला मात्र कळवण तालुक्यात येतो. धोडांबे बघून परत हायवेला येऊन चांदवडमाग्रे मालेगाव, धुळ्याला जाता येते. चांदवडच्या रेणुका देवीचे मंदिर घाटातच लागते. अतिशय छान, हवेशीर परिसर आहे. मालेगावजवळच चंदनपुरी, बाणाई मंदिर आहे. मालेगाव ओलांडल्यावर साधारण पंचवीस किलोमीटरवर हायवेलाच लागून उजवीकडे झोडग्याचे पुरातन माणकेश्वर मंदिर आहे. हे हेमाडपंथी मंदिर झुटुंब डोंगरपायथ्याशी आहे. झोटिंग बाबा नावाचे साधू इथे राहत असत. या मंदिरावर अतिशय सुंदर कोरीव काम आहे. मंदिराच्या समोरच एक पडके मंदिरदेखील दिसते. त्याचे भग्नावशेष बघून वाईट वाटते. इथे नीट जतन-संवर्धन झाले पाहिजे. माणकेश्वर मंदिराच्या माहितीचे, कोरीव शिल्पांच्या बारकाव्यांचे फलक लावले गेले पाहिजेत, असे वाटते. आसपासच्या गावांतून दर्शनाला आलेली मंडळीदेखील या डोंगरपायथ्याच्या मदानात नेहमी दिसतात. हा माणकेश्वर मंदिर परिसर हवेशीर आणि सुंदर आहे.

इथून पुढे पंधरा किलोमीटरवरच लळिंग गाव आणि लळिंग किल्ला लागतो. फारुखी राजांच्या काळात हा किल्ला बांधला गेलाय, असे मानले जाते. इथेच बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेला लांडोर बंगला आहे. लळिंग गावात सहजच किल्ल्याची चौकशी करताना असे लक्षात आले की, आजकाल इंटरनेटवरून माहिती शोधून खूप हौशी ट्रेकर्स या परिसरात येतात. ते वेगवेगळ्या डोंगरांची आणि किल्ल्यांची यादी दाखवितात. पण गावकरी म्हणतात, ‘ते सगळे पडलेले आहेत. काही ठिकाणं तर आम्हाला इतकी वर्षे राहून माहीत नाहीत. खरे तर ती ठिकाणं फक्त कागदावर उरलेले आहेत.’ लळिंग गावाहून धुळे अगदीच जवळ आहे. त्याच वाटेत धुळ्याचे गुरुद्वारा, जुने विठ्ठल मंदिर लागते. हायवेने धुळ्यात शिरता शिरताच धुळ्याची दोन प्रमुख आकर्षणे वाटेतच दिसतात. एक म्हणजे समर्थ वाग्देवता मंदिर आणि दुसरे म्हणजे इतिहासाचार्य राजवाडे वस्तू संग्रहालय. समर्थ वाग्देवता मंदिर संतसाहित्याच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. तिथे मूळ दासबोधाची शंकर श्रीकृष्ण देव यांनी तयार केलेली प्रत जतन केलेली आहे. अनेक पोथ्या, बखरी, संतांचे साहित्य, ताडपत्र आणि ताम्रपत्रावरील लेख इथे बघायला मिळतात. समर्थानी लिहिलेले वाल्मीकी रामायण इथे संग्रही आहे. रस्त्याला लागूनच असला तरी वाग्देवता मंदिर परिसर छान वाटतो. राजवाडे संग्रहालय इथून जवळ आहे. दुपारी एक ते साडेचार हे संग्रहालय बंद असते, याची नोंद घेऊन जाणे आवश्यक आहे. राजवाडे संग्रहालय दुमजली आहे. खालच्या भागात खान्देश परिसरात सापडलेल्या वेगवेगळ्या मूर्ती बघायला मिळतात. वरील बाजूस राजवाडे यांचा संग्रह जतन केलेला आहे. त्यात अनेक दुर्मीळ कागदपत्रे, वस्तू आहेत. इथे ग्रंथालयदेखील आहे. वेगवेगळे अभ्यासक, संशोधक यांना पर्वणीच आहे. ही वास्तू अतिशय देखणी आहे. अक्कलकुव्याहून आणलेले शिसम लाकडात कोरीव काम असलेले जुने दालनच वास्तूच्या वरील भागात अगदी सुरेख बसविलेले आहे. ही दोन्ही संग्रहालये बघायला पुष्कळच वेळ ठेवायला हवा.

भारतात जी मोजकी शहरे आहेत, ज्यांच्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यात धुळे हे एक शहर आहे. मुंबई-आग्रा मार्ग त्यातला एक. जुना आग्रा रोड तर धुळ्यात अतिशय गजबजलेल्या वस्तीत आहे. दुसरा कोलकाताकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि तिसरा मार्ग म्हणजे हरयाणा, मध्य प्रदेशातून येऊन सोलापूरमाग्रे हुबळीकडे जाणारा रस्ता. नवे धुळे हे अतिशय आखीव शहर आहे. सर विश्वेश्वरैया यांनी ही नगररचना केलेली आहे. सात प्रमुख गल्ल्या आणि त्यांना आडव्या जाणाऱ्या अजून काही, अशा तेरा गल्ल्या इथे आहेत. पाच कंदील हादेखील बाजाराचा गजबजलेला भाग आहे. धुळ्याच्या या गल्ल्यांचा फील घ्यायचा असेल तर इथे सकाळच्या वेळी चालायला हवे. धुळ्यात गल्ल्यांच्या भागात माणूस हरवूच शकत नाही, इतके त्या आखीव आहेत, असे इथले लोक सांगतात. मालेगाव मॉलीवूड सिनेमासाठी प्रसिद्ध आहेच. पण जुन्या धुळ्यातल्या वयस्कांशी गप्पा मारताना त्यांना सिनेमाचे अतिशय वेड असायचे, ते लक्षात येते. सिनेमात कोणीही क्रांतिकारी, पंडित नेहरू, स्वातंत्र्यसनिक वगरे दिसले की लोक थिएटरमध्येच जोरदार टाळ्या वाजवत त्या काळी, अशी आठवण काही जण सांगतात! क्रांतिकारक शिरीषकुमार यांच्या आठवणीदेखील इथले जुने लोक सांगतात. धुळे जसे वाढले तसा देवपूर परिसरही गजबजू लागला. धुळ्यात पांझरा नदीकिनारी एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या पांझरा नदीत कधीच पाणी नसते. त्यात एकाने पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. काही नाही, फक्त हाडे मोडून घेतली, असे लोक गमतीत सांगतात! धुळ्यात गोटी सोडा हेदेखील एक आकर्षण आहे. एकवीरा मंदिराच्या समोरच्या बाजूलाच गोटी सोडय़ाची काही दुकाने आहेत. काचेच्या या सोडय़ाच्या बाटल्या आता दुर्मीळ होत चालल्या आहेत. देवपूर रस्त्यानेच धुळ्याच्या बाहेर पडून इंदौर हायवेने धुळ्याहून नव्वद किलोमीटरवर असणाऱ्या बडी बिजासन देवीला जाता येते. धुळे-मध्य प्रदेश सीमेवर सातपुडा पर्वतरांगांच्या घाटामध्ये ही देवी आहे. सेंधवा, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश. तापीचे पात्र ओलांडून हा परिसर गाठावा लागतो. शिरपूरहून साधारण तीस किलोमीटर. रस्ता अतिशय उत्तम आहे. बडी बिजासन मंदिराच्या बाजूच्या टेकडीवरदेखील चढता येते. परिसर अतिशय लोभस आहे. एकूणच खान्देश दूधदुभत्यासाठी प्रसिद्ध आहे. दोंडाईचा इथे मिरचीचा मोठा बाजार असतो. धुळे नवापूर रस्त्याला अनेक पवनचक्क्या दिसतात. सौर ऊर्जेचा देखील वापर करायच्या काही योजना आहेत. नवापूर, नंदुरबार भागात पॅरॅबोलिक सोलर कुकर अनेक घरांपुढे दिसतात. नवापूर हेसुद्धा मोठय़ा गल्ल्यांचे आणि आखीवरेखीव गाव आहे. मोठाले बंगले इथे दिसतात. नवापूर रेल्वे स्थानकातूनच महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्यांची सीमा गेलेली आहे. धुळे-साक्री रस्त्याला नकाणे तलाव आहे. हरणमाळ हा आदिवासी भाग तिथून जवळ आहे. या साक्री रस्त्यानेच दहिवेलमाग्रे कोंडाईबारीला जाता येते. कोंडाईबारी फाटय़ाला आमळीकडे रस्ता जातो. आमळी येथे कन्हैयालाल महाराज मंदिर आहे. इथे झोपलेल्या विष्णूची पुरातन मूर्ती आहे. हा दगड विशिष्ट असा आहे. विष्णूच्या बेंबीतून पाणी येताना दिसते, याबद्दल धुळे परिसरात हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मूर्तीतून नेमके कुठून पाणी येते, हे गूढ आहे. कोंडाईबारी आमळी रस्ता डोंगराडोंगरांतून जातो. धुळ्याहून साधारण नव्वद किलोमीटरवर असलेला अतिशय शांत, सुंदर असा हा परिसर आहे. आमळीच्या वाटेवर वन विभागाची मालनगाव रोपवाटिका आहे. आमळी गावात ‘चंपा’ या साडेतीन किलोच्या मापाने खुशबू आणि इंद्रायणी असे दोन प्रकारचे तांदूळ विकत मिळतात. नागलीदेखील विकली जाते. आमळी गावाच्या पुढे दोन किलोमीटरवर अलालदरी धबधबा आहे. रस्ता ठीक नाहीये. पण हा भाग पावसाळ्यात आवर्जून बघण्यासारखा आहे. वन विभागाचे व्हय़ू पॉइंट्स तीन-चार ठिकाणी आहेत. नितांतसुंदर असेच या प्रदेशाचे वर्णन करावे लागेल.

कोंडाईबारीहून घाटाच्या वाटेने नवापूर केवळ चाळीस किलोमीटर आहे. आमळी गावातूनदेखील डोंगररस्त्याने नंदुरबार जिल्ह्य़ातील शबरीधाम इथे जाता येते. निसर्गसंपन्न प्रदेश आहे, पण माहीतगार असल्याशिवाय हा रस्ता घेऊ नये. नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्यात सारंगखेडा हे ठिकाण आहे. शहाद्यापासून पंधरा किलोमीटरवर तापीच्या किनारी हे गाव वसलेले आहे. धुळे-शहादा नव्वद किलोमीटर, तर नंदुरबार-शहादा साधारण चाळीस किलोमीटर आहे. डिसेंबरमध्ये इथे घोडे आणि बलांचा प्रसिद्ध बाजार असतो. कोटय़वधींची उलाढाल इथे होते. घोडय़ांच्या विविध करामती आणि त्यांच्या किमतीही ऐकून आपण थक्क होतो. दत्त जयंतीला मोठी यात्रा असते. छोटय़ा टेकडीवर एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. सारंगखेडय़ाहून प्रकाशा तीर्थक्षेत्र जवळ आहे. प्रकाशा हे दक्षिण काशी किंवा प्रति काशी मानले जाते. इथे शंकराची एकशे आठ मंदिरे आहेत. केदारेश्वर आणि संगमेश्वर ही त्यातील प्रमुख मंदिरे आहेत. तापी, गोमाई आणि गुप्त पुिलदा नदी अशा त्रिवेणी संगमावर हे ठिकाण आहे. आसपासचा परिसरही सुंदर आहे. वाटेत मोठाले दगड दिसतात. त्यांचे आकार नजर खिळवून ठेवतात. तिथे लोकांची भाषा ऐकत बसावे एका कोपऱ्यात. छान वाटते! अनेक निसर्ग केंद्रे वाटेत दिसतात. नंदुरबार जिल्ह्य़ात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे मांडू राजांचे राजधानीचे ठिकाण होते. इथला यशवंत तलाव प्रसिद्ध आहे. अत्यंत नयनरम्य, जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश आहे. तोरणमाळच्या डोंगरावर जाताना अनेक भागांत दोन्ही बाजूला दऱ्या असलेला प्रदेश आहे. उत्तम गाडी आणि उत्तम ड्रायव्हर इथे हवा. तळोद्याला जुनी गढी आहे. धडगाव हेदेखील थंड हवेचे ठिकाण नंदुरबारमध्ये आहे. पूर्व खान्देश म्हणजे जळगाव. धुळ्याहून जळगाव साधारण शंभर किलोमीटर आहे. धुळ्यातून पारोळा रोडने साठ किलोमीटरवर एरंडोल-पद्मालय करीत जळगावला जाता येते. झांशीची राणी या पारोळ्याचीच. एरंडोल म्हणजेच एकचक्रनगरी अथवा अरुणावती. इथे पांडवांचे वास्तव्य होते असे मानतात. एरंडोलहून अगदी जवळ पद्मालय हे प्रभावक्षेत्र आहे. सिद्धिविनायकच्या साडेतीन पीठांपकी एक पूर्ण पीठ. इथे उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणेश एकाच मंदिरात बघायला मिळतात. दोन्ही गणेशांची वेगवेगळी कथा आहे. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी कार्तवीर्य मंत्र विख्यात आहे. हा कार्तवीर्य इथेच जन्माला आला. असे सांगितले जाते की त्याला हातपाय नव्हते. उजव्या सोंडेच्या गणेशाची आराधना करून दोन पायांचा सहस्रबाहू कार्तवीर्य घडला. त्याने सहस्र हस्ते गणेशाची आराधना केली. गणेश तिथे थांबले. गर्व झालेल्या शेषनागाला शंकराने फेकून दिले. तो पद्मालयाच्या तळ्यात पडला. त्याने डाव्या सोंडेच्या गणेशाची आराधना केली. शंकराने शेष नागाचा परत स्वीकार केला. म्हणून डाव्या सोंडेचा गणेश शेषनागाच्या विनंतीने तिथे थांबला, अशी कथा आहे. यांना ‘आमोद प्रमोद गणेश’ म्हणून ओळखतात. जवळच असलेली जागा भीमाने बकासुराचा वध केला ती जागा म्हणून दाखवली जाते. फरकांडा येथील झुलते मनोरे एरंडोलहून जवळ आहेत. इथे बरीच पडझड झालेली आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगांमध्ये मनुदेवी मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. महर्षी व्यासांचे मंदिर यावल येथे आहे. चाळीसगाव येथे पाटणादेवी मंदिर आहे. हा परिसर म्हणजे भास्कराचार्याची जन्मभूमी. वाल्मीकी ऋषींच्या ‘वाल्याचा वाल्मीकी झाला’ या गोष्टीतल्या ‘वाल्या’ असतानाच्या वाटमाऱ्या या परिसरात होत, असे स्थानिक सांगतात. गौताळा अभयारण्य परिसर आहे हा. पितळखोरे लेणी इथे डोंगरावर आहेत. कन्नड घाटातून औरंगाबादकडे जाता येते.

चाळीसगाव येथे ‘केकी मूस कलादालन’ आहे. रेल्वे स्टेशनहून अगदीच तीन मिनिटांच्या अंतरावर ते आहे. तर रस्तामाग्रे मालेगाव रस्त्याला कॉलेजकडे जाणारा एक चौक आहे, तिथून विचारत जावे लागते. चित्रकलेविषयीची एकूणच अनास्था केकी मूस कलादालनाचा ‘बाय रोड’ पत्ता शोधताना लक्षात येते. ही ब्रिटिशकालीन वास्तू अप्रतिम आहे. टेबल टॉप फोटोग्राफीतले केकी मूस हे भारतातले महर्षीच. कलादालनाची माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलून आणि सरकारने मूस यांच्यावर एक पुस्तक काढले होते, त्यातून थोडीफार कळते. त्या पुस्तकाच्या केवळ शंभर प्रती काढण्यात आल्या. त्यापैकी एक प्रत कलादालनात ठेवलेली आहे. मूस यांनी जवळपास साडेचार हजार ओरिगामी मॉडेल्स बनविली होती. त्यातील अगदी थोडीच तिथे मांडलेली आहेत. चित्रकार केकी मूस सतारवादकदेखील होते. त्यांनी स्वत: कळशा आणि डबे यांच्यातून वाद्य्ो घडविली आहेत. अतिशय बहुआयामी असे हे व्यक्तिमत्त्व. मूस यांच्याशी संबंधित भरपूर आठवणी कलादालनातले लोक सांगतात. मूस त्या बंगल्यातून ४८ वष्रे बाहेर पडले नाहीत, असेही म्हटले जाते. हे कलादालन चुकवता कामा नये. या कलादालनाकडून नांदगावजवळचे साडेतीन शनिपीठांपकी एक असलेले नस्तनपूरदेखील वाटेतच आहे. तिथून नांदगाव- मनमाड- लासलगावमाग्रे नासिक गाठता येते.
असा हा तापीच्या खोऱ्यात वसलेला वैविध्यपूर्ण खान्देश वेळ काढून बघायलाच हवा!

प्राची पाठक
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य : लोकप्रभा

Story img Loader