उन्हाळ्यात घरातील भिंतींवर, फरशीवर तर कधी किचनवर लाल मुंग्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात. या मुंग्या किचनमधील दुध, साखरसह इतर खाद्यपदार्थ तर खराब करतातच पण काहीवेळा अंथरुण किंवा कपड्यांमध्ये चढून जोरात चावतात. त्यामुळे व्यक्तीला खास सुटणे आणि अस्वस्थता जाणवू लागते. घरभर फिरणाऱ्या मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक घरात केमिकलयुक्त स्प्रे,खडू आणला जातो. पण त्यातील केमिकल आपल्या शरीरासाठी घातक ठरते. यामुळे या समस्येवर उपाय म्हणून मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात किचनमधील फक्त तीन पदार्थ वापरुन मुंग्यांपासून सुटका कशी मिळवायची हे सांगितले आहे. चला जाणून घेऊ उपाय…
मुंग्या पळवणयासाठी हिंग आणि डेटॉलचा असा करा वापर
मुंग्यांना पळवून लावण्यासाठी सर्वप्रथम एक स्प्रे बाटली घ्या, त्यात एक कप पाणी आणि दोन चमचे लिक्विड डेटॉल घ्या, यानंतर त्यात एक चमचा हिंग पावडर घाला. आता बाटलीचे झाकण लावून चांगली हलवा. मुंग्यांना पळवण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे घरात जिथे जिथे मुंग्याच्या रांगा दिसतील तिथे हे तयार लिक्विड स्प्रे करा.
मुंग्यांना पळवण्यासाठी प्रभावी उपाय
१) लिंबू
मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबाचा उपयोग करु शकता. यासाठी घरात ज्या ठिकाणी जास्त मुंग्या येतात तिथे लिंबाची साल ठेवावी लागेल. मुंग्यांना आंबट गोष्टी आवडत नाही त्यामुळे लिंबाच्या वासाने मुंग्या पळून जातील.
२) मीठ
मुंग्या मिठापासून देखील दूर पळतात. त्यामुळे घरातील ज्या कोपऱ्यात मुंग्यांचा वावर अधिक दिसून येतो तिथे मीठ शिंपडा. यामुळे मुंग्यांपासून नैसर्गिकरित्या सुटका होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्ही पाण्यात मीठ उकळून एका स्प्रेच्या बाटलीत भरा आणि घरात ज्या ज्या ठिकाणी मुंग्या दिसतात तिथे स्प्रे करा.
३) पुदीना
तुम्हाला पुदिन्याचा वास आवडत असेल पण मुंग्यांना अजिबात नाही. पुदिना हे नैसर्गिकरित्या किटकांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे मुंग्यांना पळवून लावण्यासाही त्याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही बाजारातून पेपरमिंट एसेंशियल ऑइल विकत आणून नंतर ते कापसाच्या बोळ्यावर घ्या आणि मुंग्या ज्या ठिकाणी अधिक आहे तिथे लावा. अशाने क्षणात लाल मुंग्यांना पळवू लावू शकता.