तुम्ही व्हॉटसअॅप वापरत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच चिंता करायला लावणारी आहे. याचे कारण म्हणजे भारताबरोबरच जगभरातील २०० देशांतील लोकांच्या व्हॉटसअॅपमधील डेटा हॅक होत आहे. याबरोबरच फेसबुक आणि स्नॅपचॅटमधील डेटाही स्पायवेअरच्या माध्यमातून हेरला जात आहे. काही अभ्यासकांनी गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही अॅप्लिकेशन्स शोधून काढली आहेत, ज्याद्वारे ग्राहकांच्या व्हॉटसअॅपवरील डेटा हॅक केला जात आहे. हा स्पायवेअर प्ले स्टोअरवर ६ अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पोहोचवला गेला होता. ही अॅप्लिकेशन्स एक लाखाहून जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आली आहेत. या स्पायवेअरचे नाव ANDROIDS_MOBSTSPY असून यामध्ये Flappy Birr, Flappy Birr Dog, Flashlight, HZPermis Pro Arabe, Win7Simulator आणि WinLauncher या अॅप्लिकेशन्सचा वापर करुन डेटा हॅक केला जात होता.

चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी कोणताही युजर अशाप्रकारे स्पायवेअर असलेले अॅप्लिकेशन आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करतो तेव्हा हा स्पायवेअर त्या मोबाईलमधील इंटरनेट कनेक्शन हॅक करुन आपल्या कमांड आणि कंट्रोल सेक्शनला जोडून घेतो. हे कनेक्ट झाल्यावर आपल्या मोबाईलमधील भाषा, ज्या देशाला मोबाईल रजिस्टर केला आहे त्या देशाचे नाव आणि मॅनिफॅक्चरर अगदी सहज हॅक करता येतो. यानंतर हॅकर्सकडून ग्राहकांच्या मोबाईलवर फॉल्स नोटीफिकेशन्स आणि काही कमांड पाठवणे सुरु होते. या स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आलेल्या मोबाईलमधील कॉल लॉग, संपर्क क्रमांक, मेसेज, ऑडीयो आणि व्हिडियो फाईल तसेच फोटो सहज मिळवू शकतात.

अभ्यासकांनी या स्पायवेअरबाबत आणखी तपास केल्यानंतर त्याद्वारे व्हॉटसअॅप, स्नॅपचॅट आणि फेसबुक अशा सर्व गोष्टींमधील डेटा हॅक केला जात आहे. गुगलला या स्पायवेअरबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या प्लेस्टोअरमधून ही ६ अॅप्लिकेशन्स हटवली आहेत. आता ज्या १ लाख लोकांनी ही अॅप्लिकेशन्स डाऊनलोड केली होती त्यांचा डेटा चोरला गेला आहे की सुरक्षित आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र गुगल प्ले स्टोअरवरुन कोणतेही अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना ग्राहकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Story img Loader