भारतीय एअरटेलने दिवाळीनंतर धमाकेदार प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकाला १०५ जीबी डेटा मिळणार आहे. ४१९ रूपयांचा या प्लॅनची वैधता ७५ दिवसांची असणार आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सातत्याने नवनवे प्लॅन लाँच करत आहे. या नव्या प्लॉननुसार ग्राहकांना दररोज १.४ जीबी डेटा मिळणार आहे. दरम्यान  ५४९ आणि ७९९ रुपयांचे प्रीपेड प्लान कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी उपलब्ध नसतील.

एअरटेलच्या या नव्या प्लानमध्ये ग्राहकाला दररोज १.४ जीबी डेटासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. एअरटेलचा ग्राहक ज्या भागात राहतो, तेथे ४जी सुविधा नसल्यास ३जी किंवा २जी नेटवर्कवरही या प्लानचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, १९९, ३९९, ४४८ आणि ५०९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्येदेखील दररोज १.४ जीबी डेटा मिळतो.

भारती एअरटेलने दिवाळीची संधी साधत आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी पाच नवे प्रीपेड पॅक लाँच केले होते. एअरटेलने 178 रुपये, 229 रुपये, 344 रुपये, 495 रुपये आणि 559 रुपयांचे प्लॅन लाँच केले.  178 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी 4 जी डेटा मिळेल. 28 दिवस या प्लॅनची वैधता असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादीत कॉलिंगसह 100 एसएमएस दररोज मिळतील.

229 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून दररोज 1.4 जीबी डेटा मिळेल. म्हणजे युजरला एकूण 39.2 जीबी डेटा वापरता येईल. तर 344 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. 495 आणि 559 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.4 जीबी डेटा युजरला मिळेल. 495 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस तर 559 रुपयांच्या प्लॅनची वैधता 90 दिवस असेल. या सर्व प्लॅनमध्ये अमर्यादीत लोकल, एसटीडी आणि मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा, तसंच 100 एसएमएस दररोज वापरण्यासाठी मिळतील.