मेंदूच्या ऱ्हासामुळे होणारे रोग व कर्करोग ज्यामुळे होतात, त्यास कारण ठरणारे रेणू शोधणारे जैवसंवेदक विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. काचेच्या पट्टीवर ऑरगॅनिक नॅनोमीटर तयार करण्यात आला असून तो एका थराचा आहे. जैवसंवेदकात पेप्टाइड ग्लुथिओनचा प्रकार वापरण्यात आला आहे. हे रसायन ग्लुटाथिओन एस ट्रान्सफरेज या विकराशी या जैवसंदेवकाचा संबंध येतो, तेव्हा त्याची विशिष्ट क्रिया घडत असते. ग्लुटाथिओन एस ट्रान्सफरेज या रसायनाचा संबंध कंपवात व स्मृतिभ्रंशाशी आहे. शरीरात या रसायनाचे रेणू कमी प्रमाणात असतील, तरी ते ओळखण्याची क्षमता जैवसंवेदकात असते. कारण त्यात नॅनोमेट्रिक संवेदनशीलता असते. ब्राझीलमधील कॅम्पिनाज येथे असलेल्या नॅशनल नॅनोटेक्नॉलॉजी लॅबोरेटरीतील कालरेस सीजर बॉफ बुफॉन यांनी सांगितले, की प्रथमच ऑरगॅनिक ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजी या तंत्राचा वापर जीएसएच-जीएसटी जोडय़ा शोधू शकतात, ज्या मेंदूरोगात महत्त्वाच्या असतात. हा संवेदक सहज वापरता येणारा व कमी खर्चाचा असून त्याच्या मदतीने विविध रोगांचे रेणू शोधता येतात. यात रोगानुसार संवेदकातील रसायने बदलावी लागतात. यातून रोगांचा प्रादुर्भाव होण्याआधीच त्याचे निदान शक्य असते. जलद निदानासाठी साधे संवेदक किंवा मायक्रोफ्लुइडिक सिस्टीमचा वापरही करता येतो. गुंतागुंतीच्या रोगाचे पटकन, स्वस्तात निदान करण्यासाठी नॅनोमीटर स्केल सिस्टीमचा वापर केल्याने रोगाशी निगडितअसलेले रेणू ओळखता येतात, असे बफॉन यांनी ‘ऑरगॅनिक इलेट्रॉनिक्स’ या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे. जैवसंवेदकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी व त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, असे संशोधकांचे मत आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)