स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. नानांची आज जयंती. सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कार्याविषयी जाणून घेऊया.

सांगली जिल्ह्यातील येडमच्छिंद्र या मूळ गावीच ३ ऑगस्ट १९०० रोजी नाना पाटलांचा जन्म झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा हे तालुक्याचे गाव खूप आवडत असल्याने ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
tiger reserve project
विश्लेषण : सरकारला व्याघ्रप्रकल्प नको आहेत का?

१९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. हे कार्य त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु ठेवले. ४६ वर्षे ते सक्रीय समाजकारणात आणि राजकारणात होते. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला.

नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानांनी केले. नानांनी आपल्या भाषणांद्वारे ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. स्वातंत्र्यलढा म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे गावागावात पोहचवण्याचे काम क्रांतीसिंहांनी केले.

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात.

ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जायचा.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना करण्यात आली होती. त्यातल्या एका दलाचे नाव होते तुफान दल. या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी. डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करत होत्या.

तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या पाच हजार जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा – अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. त्यामुळे सामान्यांचा या प्रतिसरकारवर विश्वास बसू लागला. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले.

१९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला. नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या चार वर्षाच्या काळासाठी नाना भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.

नानांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. नानांनी ‘गांधी-विवाह’ ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.

Story img Loader