“कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच! ” अशी ओळख असणा-या कडू चवीच्या खडबडीत कारल्यांचे नाव काढले की बहुतेकांचे तोंड वाकडे होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. तसेच, वजनाची चिंता भेडसावणा-यांसाठी कारले खाणे हा अगदी उत्तम उपाय आहे. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करत असून अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी हे मदत करते. मधुमेह, मुतखडासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.
कारले यकृताच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ते यकृत स्वच्छ ठेवते आणि त्याच्या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यामुळे यकृत दीर्घकाळापर्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकते. कारल्यामध्ये फॉस्फऱस भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. आहारात त्याचा अंतर्भाव केल्यास जेवण व्यवस्थित पचते. शिवाय भूकही चांगली लागते. कारले नियमितपणे कारल्याचे सेवन केल्यास दमा आणि ब्रोंकाईटिससारख्या श्वासासंबंधी गंभीर आजारांवर मात करू शकता. कर्करोगाशी सामना करण्यासाठी कारले गुणकारी आहे हे आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ते शरीराला मदत करते. मुतखड्याच्या रुग्णांसाठी कारले उपयुक्त आहे. कारल्याच्या सेवनामुळे मुतखडे फुटून ते मुत्राच्या मार्गाने बाहेर पडू शकतात. कारल्यात क्विनाईन असल्याने मलेरियावर ते आहार्य द्रव्य म्हणून वापरण्यात येते.
कडू कारल्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे कारले आवडत जरी नसले तरी काही प्रमाणात त्याचा आहारात समावेश करा.