रक्ताच्या कर्करोगामुळे निरोगी स्थितीतील अस्थिमज्जेच्या (बोनमॅरो) पेशींमध्येही वृद्धावस्थेची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे संशोधकांना आढळून आले आहे. ही बाब प्रथमच नोंदली गेल्याने यातून भविष्यात वृद्धावस्था टाळण्यासाठीच्या औषधांच्या निर्मितीचा मार्ग सुकर होऊ शकतो.
इंग्लंडमधील ईस्ट अॅन्ग्लिया विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, वृद्धावस्थेच्या प्रक्रियेतून कर्करोग होण्यास चालना मिळते हे सर्वश्रुत आहे. असे असले तरी या वेळी प्रथमच याच्या उलट, म्हणजे कर्करोगातून वृद्धावस्थेला चालना मिळत जाते, ही वास्तव पुढे आले आहे.
याबाबतचा अभ्यास ‘ब्लड’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. निरोगी अवस्थेतील अस्थिमज्जेच्या पेशीसुद्धा त्यांच्या सभोवतालच्या कर्कपेशींमुळे वेळेआधीच जीर्ण-वृद्ध झाल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. अस्थिमज्जेच्या वृद्ध झालेल्या पेशींमुळे ल्युकेमिया निर्माण होण्यास आणि त्याची वाढ होण्यास गती मिळते. यातून एकप्रकारचे दुष्टचक्र तयार होऊन हा रोग वाढतच जातो.
या अभ्यासात, ल्युकेमियाच्या रुग्णाच्या अस्थिमज्जेच्या पेशी वेळेआधीच वृद्ध होण्याची प्रक्रिया कशी घडत जाते, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधनाचा भविष्यातील उपचार पद्धतीसाठी कसा लाभ होऊ शकतो, हेसुद्धा ठळकपणे मांडण्यात आले आहे.
याबाबत ईस्ट अॅन्ग्लिया विद्यापीठातील स्टुअर्ट रुशवर्थ म्हणाले की, कर्करोगामुळे वृद्धावस्था (अकाली) येते, याचा पुरावा आमच्या संशोधनातून मिळाला आहे. ज्या पेशींना कर्करोग झालेला नाही, त्यांच्यातही वृद्धावस्थेची प्रक्रिया सुरू करण्यास कर्कपेशी कारणीभूत ठरतात, असेही आम्ही स्पष्टपणे दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
शरीराने रोगाला प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत ‘एनओएक्स२’ हे संप्रेरक अंतर्भूत असते. हे संप्रेरक ल्युकेमियाच्या पेशींमध्ये (अॅक्युट माईलॉइड ल्युकेमिया) आढळून येते. ते वृद्धावस्थेच्या स्थितीसाठी कारणीभूत असल्याये दिसून आले. हे संप्रेरक एक प्रकारचे सुपरऑक्साइड तयार करते. या संप्रेरकाला अटकाव केल्यास निरोगी पेशी वृद्ध होण्यास प्रतिबंध होऊन कर्करोगाची वाढ मंदावते, असा संशोधकांचा दावा आहे.