Body Odor Problem In Summer: उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे यासाठी आपल्या शरीराला घाम येत असतो. उन्हाळ्यामध्ये वातावरण जास्त गरम असल्यामुळे अतिरिक्त प्रमाणात घाम यायला लागतो. घामामुळे दुर्गंध येण्याची शक्यता असते. शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेकजण लोकांमध्ये मिसळणे टाळतात. अंगाला येणाऱ्या घामाच्या वासाने चारचौघांमध्ये फजिती होईल असे त्यांना वाटत असते. अशा परिस्थितीमध्ये हा त्रास नाहीसा व्हावा म्हणून लोक डिओ किंवा परफ्यूम्स असे पर्याय निवडतात. पण काही वेळेस डिओ/परफ्यूम्सचा वापर करुनही शरीराला दुर्गंध येऊ शकतो. या समस्येवर काही घरगुती उपाय करु शकता.
लिंबाचा रस (Lemon juice)
लिंबामध्ये जंतूनाशक घटक असतात. उन्हाळ्यात शरीराला येणाऱ्या दुर्गंधाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून लिंबाचा वापर करणे फायदेशीर ठरते. एका लिंबाचे दोन समान तुकडे करुन काखेमध्ये हळूवारपणे चोळावे. काही मिनिटांसाठी ते तुकडे काखेत लावून ठेवावे. असे केल्याने दुर्गंध येण्यास कारणीभूत असणारे विषाणू नाहीसे होतात. याव्यतिरिक्त अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून अंघोळ केल्यानेही फायदा होतो.
अॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्या जीवांणूमुळे शरीराला घाणेरडा वास येतो, ते विषाणू नष्ट करुन अंडरआर्म्समधील पीएच लेवल नियंत्रणात राहावे यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगरची मदत होते. एक छोटा कापसाचा गोळा घेऊन व्हिनेगरमध्ये बुडवा आणि घाम येणाऱ्या ठिकाणी लावा. ही कृती दिवसातून दोन वेळा करावी. असे केल्याने घामामुळे होणाऱ्या दुर्गंधीचे प्रमाण खूप कमी होते.
टोमॅटोचा रस (Tomato juice)
टोमॅटोचा छोटा तुकडा घेऊन काखेत (किंवा ज्या ठिकाणी घाम येत आहे अथवा दुर्गंध येत आहे) हळू-हळू घासावा. असे केल्याने अंगाला येणारा घाणेरडा वास नाहीसा होतो. टोमॅटोमध्ये असलेल्या गुणांमुळे उन्हाळ्यात इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो. याशिवाय टोमॅटोचा रस कापसाच्या गोळ्यावर लावून अंगावर लावल्यानेही दुर्गंधीचा त्रास कमी होतो.
आणखी वाचा – काकडीपासून बनवलेला ‘हा’ फेसपॅक उन्हाळ्यात त्वचा ठेवेल थंड, जाणून घ्या कसा तयार करायचा?
कडुलिंबाची पाने (Neem leaves)
कडुलिंबामध्ये असंख्य औषधी गुण असतात. या झाडाची पाने गोळा करुन त्यांची बारीक पावडर तयार करावी. पाण्यामध्ये ही पावडर टाकून पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट शरीरावर लावून शरीराला येणारा घाणेरडा वास नाहीसा होतो. दुर्गंध कमी होण्यासाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे असे म्हटले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)