आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यातील नाते जितके अतूट असते, तितका त्याचा दोघांनाही मानसिक पातळीवर फायदा होतो. दोघांमधील नाते घट्ट असेल, तर आजी-आजोबा आणि नातवंडे (अवसन्नता) दोघांनाही डिप्रेशनचा त्रास कधीही होत नाही, असे मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले.
अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांनी आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्या नातेसंबंधांचा अभ्यास केला. या दोन्ही पिढ्यातील नात्यांचा परस्परांवर मोठा प्रभाव असतो, असे त्यांना या अभ्यासातून दिसून आले. दोन्ही पिढ्यातील संबंधांचा मानसिक पातळीवर परिणाम होतो. जर आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यातील नाते घट्ट असेल, तर ते दोघेही डिप्रेशनला सामोरे जाण्याची शक्यता खूप कमी असते. त्याचवेळी जर हे नाते विरळ असेल, दोघांमध्येही फार कमी संवाद असेल, तर डिप्रेशनचा धोका वाढतो, असे बॉस्टन महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक सारा मूरमॅन यांना आढळले.
आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यातील संबंध चांगले असतील, तर दोघांचेही मानसिक आरोग्य अतिशय उत्तम असते, त्याचबरोबर कठीण प्रसंगात नातवंडाना धीर दिल्यामुळे आणि वेळप्रसंगी त्यांच्याकडून आधार घेतल्यामुळेही आजी-आजोबांच्या मानसिक आरोग्य सुधारते असेही या अभ्यासात दिसून आले.