स्वतंत्र उपचारपद्धतीसाठी टाटा रुग्णालयाचा पुढाकार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणांमध्ये हाडांच्या कर्करोगाचे प्रमाण ६० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले असून या वयोगटातील रुग्णांसाठी विशेष उपचारपद्धतीची आवश्यकता असल्याचे मत टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. परदेशात तरुणांना होणाऱ्या कर्करुग्णांसाठी स्वतंत्र उपचारपद्धती आहे. टाटा रुग्णालयातही या वयोगटासाठी स्वतंत्र उपचारपद्धती सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

सध्या १५ ते २९ या वयोगटातील कर्करुग्णांना दिली जाणारी उपचारपद्धती अपुरी आहे. केवळ किमोथेरेपी, रेडिअेशन देऊन कर्करोग बरा होत नाही. सातत्याने औषधांचे डोस घेण्यासाठी मानसिक तयारीही आवश्यक असते, असे टाटा रुग्णालयाचे बाल व प्रौढ कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रीपाद बनावली यांनी सांगितले. २ व ३ सप्टेंबर २०१७ रोजी टाटा मेमोरिअल रुग्णालयातर्फे ‘किशोरवयीन आणि तरुण रुग्णांमधील कर्करोग’ या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत किशोरवयीन आणि तरुण रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, कर्करोगमुक्त रुग्ण आणि समाजातील तरुणांच्या मनातील सध्याच्या उपचारपद्धती आणि उपचारांच्या पर्यायाबद्दल असणारी शंका व भीती याबद्दल चर्चा होणार आहे. लवकरच टाटा रुग्णालयात या वयोगटातील रुग्णांसाठी विशेष उपचारपद्धती सुरू करण्यात येणार असून यामध्ये रुग्णांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष दिले जाईल.

कर्करोगाचे निदान झालेले किशोरवयीन आणि तरुण रुग्णांना (१५ ते २० वयोगट) शारीरिक व मानसिक विकास, स्वत:ची ओळख, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांच्याशी निगडित असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. कर्करोगाचे निदान झाल्यापासून उपचारांदरम्यान आणि उपचार संपल्यानंतर या गटातील रुग्णांच्या गरजांबाबत फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होण्यासाठी या उपगटातील रुग्णांसाठी आरोग्य केंद्र, जनजागृती, सामाजिक व मानसिक मदत, शिक्षण व व्यवसायभिमुख प्रशिक्षण याकडे खास लक्ष द्यायला हवे, असे डॉ. बनावली यांनी नमूद केले.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bone cancer health news