लंडन : कुठल्याही प्रकारच्या व्यायामाने मेंदूच्या आरोग्यास फायदाच होत असतो असे मत संशोधनात व्यक्त करण्यात आले आहे. जे लोक मेंदूच्या आजारातून किंवा आघातातून बरे होत असतात त्यांच्यात वेगवेगळ्या तीव्रतेचा व्यायाम वेगवेगळ्या मेंदू कार्यात फरक घडवत असतो असे संशोधकांचे मत आहे.ब्रेन प्लास्टिसिटी या नियतकालिकात म्हटले आहे,की विश्रांती अवस्थेत मेंदूची चुंबकीय सस्पंदन प्रतिमा व व्यायाम केल्यानंतरची प्रतिमा ही वेगळी दिसून येते. कमी तीव्रतेच्या व्यायामामुळे मेंदूतील ज्या जोडण्या विचार नियंत्रण तसेच लक्ष केंद्रीकरण याच्याशी संबंधित असतात त्यांच्यात चांगला फरक होतो.
जर जास्त तीव्रतेचा व्यायाम असेल तर त्या शारीरिक हालचालींनी भावनांशी निगडित असलेल्या मेंदूतील जोडण्यांवर चांगला परिणाम दिसून येतो. मेंदू व उर्वरित शरीर यांचा संबंध शोधण्यात मेंदूच्या एमआरआय प्रतिमा उपयोगी असतात, असे मत जर्मनीतील बॉन विद्यापीठाच्या अँजेलिका स्मिट यांनी व्यक्त केले आहे. अॅथलिट्सच्या मेंदूचे संशोधन करणे यातून शक्य होणार आहे. त्यांच्या मेंदूत नेमके काय बदल होतात हे समजणार आहे. एकूण २५ पुरुष अॅथलिटवर ट्रीडमेल चाचणीनंतर मेंदूची एमआरआय छायाचित्रे घेऊन प्रयोग करण्यात आले. यात त्यांना तीस मिनिटे मध्यम व सौम्य, तसेच तीव्र स्वरूपाचा व्यायाम तीस मिनिटे दर दिवसाआड करण्यास सांगण्यात आले, नंतर त्यांच्या मेंदूच्या एमआरआय प्रतिमा घेण्यात आल्या. त्यांच्या सकारात्मक व नकारात्मक भाषणांबाबत एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. काही मानसिक व वर्तनात्मक आजारांवर कोणत्या प्रकारचा व्यायाम किती प्रमाणात करावा याचा उलगडा यात आणखी संशोधनातून होणार आहे.