अनेकदा ब्रेड उरतो. मग तो कोरडा खाणे जिवावर येते आणि तसाच टाकून देणेही. त्याचसाठी हा झटपट पदार्थ.
साहित्य – उरलेला ब्रेड, रवा किंवा तांदूळाचे पीठ, आंबट दही, मीठ, कांदा, किसलेले गाजर, कोथिंबीर, मिरची.
कृती – ब्रेडचा कोरडा भुगा होईपर्यंत तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. त्यामध्ये रवा किंवा तांदूळाचे पीठ यापैकी जे आवडत असेल ते घालावे. अर्थात हे पीठ किंवा रवा दोन्ही ब्रेडच्या चुऱ्याइतके न घालता त्याच्या अध्र्याने घालावे. या पिठात आंबट दही घालून ते साधारण दहा मिनिटे भिजवून ठेवावे. हे मिश्रण सरसरीत व्हायला हवे. कारण त्याचे उत्तप्पे घालायचे आहेत. या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घालावे. बारीक चिरलेला कांदा आणि किसलेले गाजर घालावे. गाजर आवडत नसेल तर त्याऐवजी बारीक चिरलेली सिमला मिरची, कोबी, पालक अशा प्रकारची कोणतीही आवडती भाजी वापरता येईल. आता या मिश्रणाचे उत्तप्पे करावे. चटणी, सॉससोबत खायला द्यावे. उत्तप्प्यांऐवजी तुम्हाला याच मिश्रणाचे आप्पेही करता येतील.