दिवसाची सुरुवात करताना ब्रेकफास्ट करण्याला जितके प्राधान्य असते तितकेच तो पौष्टिक असणेही महत्त्वाचे आहे. ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये आज आपण बनाना पॅनकेक्स बनवणार आहोत. पॅनकेक बनवण्याची पद्धत तशी सोपी आणि ओळखीची असली तरी, त्यात आपण यावेळी केळींचा समावेश करून पॅनकेकला पौष्टीकतेचा मुलामा देणार आहोत. यामध्ये केळीचांच वापर करावा असे काहीही बंधन नाही. कारण, कल्पकतेला वाव हा असतोच. त्यामुळे केळीच्या जागी तुम्ही इतर कोणतेही फळ घेऊन या रेसिपीचा अनुभव घेऊ शकता. या पॅनकेकमध्ये अंड्याचाही वापर करण्यात आला आहे पण, माझ्या एका गुजराती मित्रासाठी मी या पॅनकेकचा ‘एगलेस व्हर्जन’ बनवून पाहिला आहे आणि त्याचा प्रत्यय देखील चांगला आले आहे.रेसिपीसाठी लागणारा वेळ- केवळ १० मिनिटे
तयार होणाऱया पॅनकेकच्या स्लाईसची संख्या- २०
साहित्य: २०० ग्रॅम मैदा, चमचा भर बेकींग पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बेकींग सोडा, १५ ग्रॅम साखर, १ अंडे, २५० मिली स्किम्ड दूध, चमचाभर लोणी, २ अतिशय योग्य केळी, मॅपेल सिरप आणि ऑलिव तेल
कृती:
* मैदा, बेकींग पावडर, बेकींग सोडा, मीठ आणि साखर यांचे मिश्रण करुन घ्या. तुम्ही एकाचवेळी मोठ्या प्रमाणात हे मिश्रण बनवून एका हवाबंद बरणीत पुढीलवेळेस वापरासाठीही तयार करून ठेवू शकतो.
* हे मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यात अंडे, दूध आणि चमचाभर लोणी घाला.
* त्यानंतर केळीचे काप देखील तयार झालेल्या मिश्रणात टाका आणि चांगले मिश्रण करुन घ्या.
* मंद आचेवर पॅन ठेवून त्यावर थोडे तेल टाका
* पॅनवर थोडे बटर टाकून थोडे सर्वत्र पसरुन घ्या. तयार केलेले मिश्रण पॅनवर गोलाकार किंवा आवडीच्या आकारानुसार टाका. मिश्रण हळूहळू गरम होऊन पॅनकेक तयार होण्यास सुरूवात होईल. प्रत्येक पॅनकेक दोन्ही बाजूने चांगला खरपूस रंगाचा होईल तोपर्यंत शिवजून घ्या.
* पॅनकेक तयार झाल्यानंतर त्यावर केळ्याचे छोटे-छोटे काप ठेवून सर्व्ह करा. आणि अशारितीने स्वादिष्ट आणि पौष्टिक ‘बनाना पॅनकेक्स’ तयार.