नवी दिल्ली : स्तनाचा कर्करोग हा प्रामुख्याने महिलांसाठी अधिक प्रमाणात धोकादायक ठरत असतानाच या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अॅस्पेराजीन अमिनो अॅसिडचे आहारातील प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे एका संशोधनातून अधोरेखित झाले आहे. अमिनो अॅसिड हे दूध, अंडी, मासे, सोयाबीन यांच्यामध्ये अधिक प्रमाणात असते.
कर्करोग निदानाची चाचणी नकारात्मक आलेल्या काही उंदरांवर यासाठी प्रयोग करण्यात आला. या वेळी त्यांच्या शरीरातील ‘अॅस्पेराजीन’चे प्रमाण नियंत्रित करण्यात आल्यानंतर त्यांचा कर्करोगाचा धोका कमी झाला. तर त्यांच्या आहारात ‘अॅस्पेराजीन’चे प्रमाण वाढवल्यानंतर त्यांच्या कर्करोगग्रस्त पेशींचे प्रमाण वाढले.
सीडर्स-सिनाई मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी सांगितले की, आहारात बदल केल्यानंतर कर्करोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. तसेच योग्य आहारामुळे पुन्हा कर्करोग होण्याचा धोकाही टाळता येतो. डॉ. रवि थढानी यांच्या म्हणण्यानुसार आहारातील बदलाचा परिणाम स्तनाच्या कर्करोगाबरोबरच अन्य कर्करोगामध्येही दिसून येतो.