टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड प्राइस वॉर सुरू आहे. दररोज प्रत्येक कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करत त्यांना खूश करायचे ठरवले आहे. रिलायन्स जिओनं स्वस्तात मस्त देऊ केलेले आकर्षक डेटा पॅक, अनलिमेटेड फोन कॉल्स यामुळे अनेकांची पसंती जिओला मिळत आहेत आणि याचा फटका इतर कंपन्यांना बसत आहे. तेव्हा जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये ग्राहकांना ९८ रुपयांत रोज १.५ जीबी डेटा मिळू शकेल.
या नवीन प्लॅनची व्हॅलिडीटी २६ दिवसांची असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. १७ मे रोजी असणाऱ्या जागतिक दूरसंचार दिनानिमित्त कंपनीने या अनोख्या प्लॅनची घोषणा केली आहे. ही ऑफर केवळ इंटरनेटसाठी उपलब्ध असून ती देशभरातील प्रीपेड ग्राहकांसाठी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या बीएसएनएल केवळ ३ जी आणि २ जी सेवा देत असून कंपनीची ४ जी सेवा अद्याप उपलब्ध झालेली नाही. याआधी बीएसएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ३९ रुपयांत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची ऑफर जाहीर केली होती. याबरोबरच आणखी एका खास ऑफरमध्ये बीएसएनएलने ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवसाला १ जीबी डेटा जाहीर केला होता. त्याचप्रमाणे सहा महिन्यांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल्सही मिळणार होते. तर आयपीएलसाठी कंपनीने २५८ रुपयांमध्ये १५३ जीबी डेटा अशी विशेष ऑफरही आणली होती. ५१ दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ३ जीबी डेटा वापरायला परवानगी होती.