कॉफीमध्ये आढवणाऱ्या कॅफीनचा जगभरामध्ये आमली पदार्थ म्हणून सर्रास वापर होत असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या एका अभ्यासाने सिध्द केले आहे. जगभरातील अनेकजण या आमली पदार्थाच्या आमलाखाली असल्याचा दावा या अभ्यासामध्ये करण्यात आला आहे.
कॅफीनचे दुष्परिणाम होत असलेले दिसत असले तरी त्याची सवय झालेले लोक त्यापासून परावृत्त होण्यास नकार देत आहेत. कॅफीनचे गर्भधारणेवर, हृदयावर विपरित परिणाम होतात. मात्र, असे असले तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या सवयीमध्ये बदल करत नसल्याचे मत अमेरिकन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लॉरा ज्युलिआनो यांनी व्यक्त केले आहे.
संशोधकांनी या प्रवृत्तीचा ‘कॅफीन युज डिसऑर्डर’ असा उल्लेख केला आहे. कॉफी, चहा, वेदना नाशके, चॉकलेट आणि सोड्यासारख्या थंड पेयांमध्ये कॅफीन असते. त्याच्या अतिसेवणामुळे अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते कॅफीनच्या विपरित परिणामांमुळे व्याधी जडलेले अनेकजण उपचारांसाठी येतात.
कॅफीनचे नकारात्मक परिणाम सहज लक्षात येत नसल्याने जगभर या आमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुळातच कॉफी, चहा आणि आता थंड पेय यांना सामाजिक मान्यता असल्याने त्याचे सेवन सहजगत्या होते. त्यामुळे त्यावर मात करणे अवघड असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तरूणांनी आणि लहान मुलांनी आताच कॅफीनवर म्हणजेच चहा, कॉफी आणि थंड पेयांच्या सेवणावर मर्यादा घालणे हाच यावर उपाय असल्याचे तज्ज्ञांनी सुचवले आहे.           

Story img Loader