कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधन
डोक्याला टक्कल असणे ही समस्या अनेकांना असते. काहींना अकाली टक्कल पडते, तेव्हा सौंदर्याचा एक मोठा ठेवाच ते केसांच्या रूपाने गमावून बसलेले असतात. टक्कलवर उपाय करणाऱ्या अनेक जाहिरातीही आपण पाहतो पण त्यात फारसे तथ्य नसते. टक्कल पडलेल्यांसाठी एक सुवार्ता म्हणजे ज्यांचे केस गळत आहेत त्यांच्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवे औषध शोधून काढले आहे आणि त्यामुळे टकलाची समस्या दूर होते, असा दावा हे औषध शोधून काढणाऱ्या संशोधकांनी केला आहे.
या औषधांमुळे केसांच्या मुळाशी असलेल्या काही वितंचकांचे काम थांबते आणि त्यामुळे केसांची वाढ पुन्हा पूर्ववत होते, असा संशोधकांचा दावा आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्रातील अँजेला एम ख्रिस्तियानो यांनी मानवी केस व उंदीर यांच्यावर हे प्रयोग केले आहेत आणि त्यात जानस किनेस हा वितंचक (एन्झाइम) समूह आढळून आला आहे, जो केसांची गळती वाढवतो. या विकरांचे कार्य थांबवणारे औषध थेट त्वचेवर चोळले तर केसांची वाढ चांगली होते. जेएके विकरांचे काम थांबवणारी औषधे ही केसांची वाढ पूर्ववत करण्याकरता वापरता येतील. पुरुषांच्या टकलावर त्यामुळे इलाज करणे सोपे जाणार आहे.
काही वेळा केसांच्या मुळाशी असलेले घटक विश्रांत अवस्थेत जातात त्यामुळे त्यांची वाढ होत नाही. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने अशा दोन जेएके इहिबिटर्सना मान्यता दिली असून त्यात रक्तरोगांवर वापरले जाणारे रूक्सोलिटिनिब व हृदयाच्या संधिवातावरील टोफॅसिनिटिनिब यांचा समावेश आहे. दोन्ही औषधांच्या चाचण्या केसगळतीशी संबंधित प्लाक सोरायसिस व अलोपेशिया एरियाटा या रोगांवर करण्यात आल्या आहेत. विशेषकरून पुरुषांमध्ये ही औषधे जास्त प्रभावी ठरली असून जेएके इनहिबिटर्स तयार करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, असे ख्रिस्तियानो यांनी सांगितले.
श्रीमती ख्रिस्तियानो यांच्या मते उंदरांमध्ये त्यांच्या त्वचेवर हे औषध चोळले असता मोठय़ा प्रमाणावर केसांची वाढ झालेली दिसली आहे, त्यात प्रतिकारशक्ती प्रणालीकडून स्वयंप्रेरणेने केसांच्या मुळांवर होणारा हल्ला रोखला जातो. ज्या उंदरांवर जेएके इनहिबिटर्सचे प्रयोग करण्यात आले, त्यांना पाच दिवस हे औषध लावले असता दहा दिवसांत नवीन केस आले. ज्या भागांत औषध लावले नव्हते, तेथे केस उगवले नाहीत. जर्नल सायन्स अडव्हान्सेस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.