भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण या आजाराला बळी पडू नये यासाठी सध्या तरुण मंडळी तब्बेतीकाडे विशेष लक्ष देत असल्याचे जाणवते. तर ज्यांना हा आजार झाला आहे ते अधिक फिट राहण्याच्या प्रयत्नात असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा आणि कोणत्या पदार्थांचा समावेश नसावा याची विशेष काळजी घेतली जाते. योग्य आहार घेतल्याने मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल यावर तज्ञांचे मत काय आहे जाणून घ्या.
‘फोर्टिस सीडीओसी कॅन्टर फॉर डायबीटीस’चे अध्यक्ष डॉक्टर अनुप मिश्रा यांच्या मते, मधुमेहाचे रुग्ण आहारासह जीवनशैलीमध्ये बदल करुन रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेऊ शकतात. मधुमेह असणाऱ्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे सोप्पे नाही, त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे गरजेचे असते. रक्तातील साखरेची पातळी कायमस्वरूपी नियंत्रणात राहू शकते का? हा प्रश्न रुग्णांकडुन सतत विचारला जातो. यावर तज्ञ सांगतात तुम्ही जर आहाराची विशेष काळजी घेतली तर औषधांशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहावी यासाठी तज्ञ कोणत्या गोष्टी करण्याचा सल्ला देतात जाणून घ्या.
आणखी वाचा : हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील ‘या’ गोष्टी; लगेच जाणून घ्या
कमी कॅलरीचे सेवन करा
जास्त कॅलरीचे सेवन केल्याने अनेक आजार उद्धवु शकतात. तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी कमी कॅलरीचे सेवन करावे असा सल्ला तज्ञ देतात.
वजन नियंत्रणात ठेवा
अनेक रिसर्च पेपरमध्ये असे नमुद करण्यात आले आहे की ज्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांचे वजन नियंत्रणात असते, त्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यासाठी आहारामध्ये कमी कॅलरी असणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करा.
जीवनशैली बदला
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला तज्ञ देतात. यामध्ये रोज व्यायाम करणे, वेळेवर झोपणे, पुरेशी झोप घेणे अशा सवयींचा समावेश होतो.