Lumpy Skin Disease In Humans: कोविड 19 संसर्ग, मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या समस्यांना तोंड देत असताना लम्पी त्वचा रोग हा चिंतेचा विषय बनला आहे. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन आजरा’मुळे आतापर्यंत ७,३०० हून अधिक पशूंचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली असून सर्व शेतकरी व पशुपालकांना प्राण्यांचे त्वरित लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांमध्येही या आजराशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, यातील मुख्य म्हणजे लम्पी त्वचा रोग माणसांना होऊ शकतो का? अशाच काही प्रश्नांवर सविस्तर माहिती जाणून घ्या.
लम्पी त्वचा रोग काय आहे?
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्रणयनांना याचा सर्वाधिक धोका आहे.
लम्पी त्वचा रोगाची लक्षणे?
लम्पी त्वचा रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
लम्पी त्वचा रोग मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो का?
लम्पी त्वचा रोग भारतात वेगाने पसरत असला तरी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी पुष्टी केली आहे की लम्पी त्वचा रोग मानवामध्ये पसरत नाही. जर हा आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असल्यासही मानवामध्ये हे संक्रमण होत नाही. लम्पी त्वचा रोगामुळे मृत्यू दर १ ते २ टक्के आहे.
हेही वाचा – दिल्लीत ‘लम्पी स्किन’ आजाराने प्रशासनाची चिंता वाढवली, सरकारने बोलावली तातडीची बैठक
पशुपालकांनी काय काळजी घ्यावी?
लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठय़ांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये.