Can you get a tan underwater: उन्हाळा सुरू आहे. कडक उन्हामुळे त्वचेला त्रास होऊ नये म्हणून लोक घरातून क्वचित बाहेर पडत आहेत. वातावरण गरम झाल्यामुळे बरेचसे लोक पाण्यामध्ये डुंबून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. स्विमिंग पूलमध्ये पोहल्यामुळे शरीराचे तापमान स्थिर राहते. त्याशिवाय व्यायामदेखील होतो. उन्हामध्ये उभे राहिल्याने त्वचा टॅन होत असते. पूलमध्ये पोहतानाही टॅनिंग होण्याची शक्यता असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जुश्या भाटिया सरिन यांनी स्विमिंग पूलमध्ये पोहताना त्वचा टॅन होऊ शकते असे म्हटले आहे. या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी पूलमध्ये असताना शरीर टॅन होण्यामागील कारणे स्पष्ट केली आहेत. डॉ. जुश्या यांच्या म्हणण्यानुसार,
- स्विमिंग पूलच्या फरशी त्वचेवर प्रकाश परावर्तित करू शकते. याने त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. समुद्रामध्ये पोहताना खाऱ्या पाण्याने सूर्यप्रकाश परावर्तित होत असतो.
- पाण्यामुळे अतिनील किरणे सहज शरीरापर्यंत पोहचू शकतात.
- थंड पाण्यामध्ये असताना सूर्याच्या किरणांमुळे होणारी जळजळ कमी होत असली तरी त्यामुळे त्वचा टॅन होऊ शकते.
त्यांनी पाण्यामध्ये जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला. पाण्यामध्ये ४०-८० मिनिटांनी सनस्क्रीनचा प्रभाव कमी होत असल्याने सतत सनस्क्रीन लावणे आवश्यक असते, असे त्यांनी सांगितले आहे.
खार आणि नाणावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वंदना पंजाबी यांनीही याबाबतची माहिती दिली आहे. “सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीमध्ये पाण्यात पोहताना सूर्यकिरणांच्या संपर्कामुळे टॅनिंग व अन्य त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. पाणी हे अतिनील किरणे प्रतिबिंबित करते. यामुळे ही सूर्यकिरणे पाण्याच्या आत जाऊन त्वचेपर्यंत पोहचतात आणि त्वचा टॅन होते. किरणांच्या संपर्कात आल्यानंतर गार पाण्यामुळे त्वचेवर कोणताही परिणाम दिसत नाही. पण २४ तासांच्या आत त्वचेची जळजळ व्हायला सुरुवात होऊ शकते,” असे डॉ. पंजाबी यांनी सांगितले.
असे घडू नये यासाठी काय करावे हेदेखील डॉ. वंदना पंजाबी यांनी सांगितले.
- Water-resistant sunblock चा वापर करावा. पाण्यात जाण्याच्या २० मिनिटांपूर्वी ते लावावे.
- उघड्या स्विमिंग पूलमध्ये पोहणे टाळा. जेणेकरून सूर्यकिरणांचा प्रभाव त्वचेवर होणार नाही.
- पोहल्यानंतर सॉफ्ट बॉडी वॉश वापरा. साबण किंवा स्क्रबर वापरणे टाळा.
- पोहल्यानंतर त्वचा हायड्रेट राहावी यासाठी शरीरावर मॉइश्चरायझिंग लोशन लावा.