आपल्या सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यातला सगळ्यात दुर्लक्षित पण कायमच महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे आपला आहार. लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत कि आपल्या आहारात अगदी सगळ्या पदार्थांचा समतोल समावेश असला पाहिजे. उदाहरणार्थ धान्य, कडधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, तेल-तूप, सुका मेवा आणि भरपूर फळं. खरंतर फळं म्हणजे आपली भूक भागवण्याचा एक पौष्टिक आणि उत्तम मार्ग. फळांतली साखर अर्थात Fructose ही आपल्या शरीरासाठी गुणकारक ठरते. पण तरीही फळांच्या सेवनाबद्दल अनेक समज-गैरसमज देखील आहेत. त्याचपैकी एक चुकीचा समज असा आहे कि, “डायबेटिक पेशंट्सनी फळं खाऊ नयेत किंवा डायबेटिक पेशंटसाठी फळं खाणं धोकादायक ठरू शकतं.” तुम्हीही कधी कोणाकडून असं ऐकलंय का? मग हाच गैरसमज आता कायमचा दूर करूया.
सर्टिफाईड क्लिनिकल डाएटिशियन, प्राध्यापक, मधुमेहविषयक शिक्षक आणि NUTR च्या संस्थापक असलेल्या लक्षिता जैन इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हे गैरसमज दूर करत म्हणाल्या कि, “आपण दररोज कमीतकमी दोन फळं खाल्ल्याने उलट टाईप 2 डायबेटीस होण्याचा धोका कमी होतो.” फळांमध्ये असलेल्या नॅचरल शुगर आणि फायबर कंटेंटमुळे डायबेटिसचा धोका कमी होण्यास मदत होते. दरम्यान, ड्राय फ्रुट्स आणि ज्युसेसमध्ये मात्र साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याचं सेवन योग्य प्रमाणातच असावं. मात्र, डायबेटिक पेशंट्ससाठी ताजी फळं हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आता जाणून घेऊया कि, डायबेटिक पेशंट्सनी नेमकी कोणकोणती फळं खावी ? कोणत्या स्वरूपात खावी? तसंच कोणी आणि कधी फळं खाणं टाळावं?
कोण-कोणती फळं खाऊ शकतात?
- सफरचंद
- केळी
- द्राक्षं
- संत्रं
- पेर
- पपई
- अननस
- टरबूज
- अंजीर
- स्ट्रॉबेरीज
- अवाकॅडो
- बेरीज
- चेरीज
- ग्रेपफ्रूट
- नेक्टराईन (Nectarines)
- पीच
- किवी
- प्लम्ज
लक्षिता जैन असंही म्हणतात कि, “ज्या व्यक्ती जास्त फळांचे सेवन करतात त्यांच्या शरीरात रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होते. हे महत्वाचे आहे कारण इन्सुलिनचं मोठ्या प्रमाणात होणारं सर्क्युलेशन (Hyperinsulinemia) शरीरातील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतं. तसंच हे केवळ डायबेटीस नव्हे तर हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि हृदयरोगाशी देखील संबंधित आहे.”
पूर्ण फळ कि फळांचा रस?
कोणत्याही फळाच्या ज्यूसपेक्षा पूर्ण फळ नेहमीच फायदेशीर ठरतं. यामागचं कारण असं कि फळांच्या ज्यूसमध्ये फायबर नसतं तर निव्वळ साखर असते. तसंच जर फळांचा ज्यूस पिणार असाल तर त्यासोबत फळाचा पल्प देखील खा. तो टाकून देऊ नका.
लक्षिता जैन याबाबत सांगतात कि, “दररोज कमीत कमी २ फळं खाल्ल्याने टाइप 2 डायबेटीसचा धोका कमी होतो. म्हणूनच फळांच्या ज्यूसऐवजी पपई, सफरचंद, संत्री, लीची यांसारखी संपूर्ण फळ खा. तसेच तुम्हाला फळांचा ज्यूसच अधिक आवडत असेल तर होममेड फळांच्या रसांचा पर्याय निवडा.”
…तर तुम्हाला फळं बंद करावी लागतील!
तुमची शुगर लेव्हल 150 mg dl जरी असेल तरी देखील तुम्ही दिवसाला एक केळं किंवा एक आंबा बिनधास्त खाऊ शकता. पण जर तुमची शुगर लेव्हल 350 mg dl पेक्षा अधिक वाढत असेल, तर शुगर लेव्हल नॉर्मल होइर्पर्यंत तुम्हाला फळं खाणं थांबवावं लागेल.