लहानपणापासून आपण सगळ्यांनी महाभारतामधील कौरव आणि पांडवांबद्दलच्या अनेक रंजक कथा ऐकल्या असतील. महाभारत आणि त्यातील कथा म्हणजे जुन्या पिढीतील अनेकांच्या बालविश्वाचा अविभाज्य भाग म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाभारतातील पाच पांडवांची नावे विचारल्यानंतर आपल्यातील अनेकजण न अडखळता एका दमात उत्तर देतील. मात्र, कुरूवंशातील शंभर कौरवांची नावे विचारल्यास दुर्योधन आणि दुशा:सन यांच्यापलीकडे आपल्याला कौरवसेनेबद्दल फार काही माहित नसल्याचे लक्षात येईल. त्यामुळे एकुणच तुम्हाला महाभारतातील कथा आणि पात्रांबद्दल विशेष जिव्हाळा असेल तर, सध्या युट्यूबवर चर्चेत असणारा ‘बिंग इंडियन’ या चॅनेलचा व्हिडिओ नक्की पाहा.
पाच मित्र एका पबमध्ये बसून एकमेकांशी गप्पा मारत असताना त्यांच्या चर्चेची गाडी कौरव आणि पांडवांवर येऊन ठेपते. त्यांच्यापैकी कुणीतरी पाच पांडवाची नावे विचारतो तेव्हा त्यापैकी चारजण सहजपणे नावे सांगतात. मात्र, कौरव बंधुंची नावे विचारल्यानंतर या चारही जणांची गाडी अडते. मग इतका वेळ शांत असणारा पाचवा मित्र आपल्याला १०४ कौरवांची नावे तोंडपाठ असल्याचे सांगत आपण फक्त तीन मिनिटांत ती सांगू शकतो असा अजब आणि चक्रावून टाकणारा दावा करतो. तेव्हा हे सगळे प्रकरण नक्की आहे तरी काय, हे पाहण्यासाठी व्हिडिओ पाहणे अनिवार्य आहे.