What Is Husband Test: पूर्वीच्या काळी वधूपरीक्षा व्हायची. म्हणजे काय तर लग्नाच्याआधी चालून आलेलं स्थळ (मुलगी) आपल्या घरासाठी साजेशी सून व मुलासाठी योग्य बायको आहे का याची परीक्षा घेतली जायची. एकार्थी चल मुली, चालून दाखव, बसून दाखव, सुईत दोरा ओवून दाखव, जेवणाचं काय येतं तुला? असे प्रश्न करून सुनेच्या पोजिशनसाठी इंटरव्ह्यू घेतला जायचा. यामध्ये खरंतर मुलगा- मुलगी यांची भेट राहायची बाजूलाच पण मानापानाच्या गोष्टीचीच जास्त चर्चा व्हायची. काळानुसार या पद्धतींवर टीका होऊन अशा कार्यक्रमांचं स्वरूप बदलायला लागलं. वधूसह वराची सुद्धा परीक्षा घेण्याची पद्धत रुजू लागली. त्यानंतर घरच्यांच्या समक्ष आधी वधू-वरच एकमेकांची परीक्षा घेऊ लागले. आणि आता मॉडर्न पिढीत घरच्यांना बाजूला सारून ऑनलाईन परीक्षांमधून आपल्यासाठी जोडीदार निवडण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. अशीच एक ‘पतीची चाचणी’ म्हणजेच ‘Husband Test’ सध्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही टेस्ट आपण घ्यावी का? घ्यावी तर कशी घ्यावी व याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो याविषयी सावितर जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Husband Test म्हणजे काय?

लग्नाआधी कुंडली व गुण जुळवायची पद्धत होती तुम्हाला माहित्येय का? त्याचचं मॉडर्न व्हर्जन म्हणजे ही चाचणी, यामध्ये तरुणींना एखादा प्रसंग रचायचा असतो व त्यात तुमच्या जोडीदाराची प्रतिक्रिया कशी आहे हे तपासायचं असतं. अगदी थोडक्यात उत्तर हवं असेल तर आपण एखादी गाण्याची ओळ म्हणू शकता किंवा एखादा तुमच्या दोघांच्या आवडीचा डायलॉग अर्धवट म्हणू शकता. जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा होणारा नवरा तुम्हाला हवं तसं उत्तर देत असेल तर तो तुमच्यासाठी साजेसा आहे असं समजायचं आणि जर तो संभ्रमित असेल किंवा तुमच्यावर हसत असेल तर मात्र तुमचं जरा कमी पटू शकतं असा अनुमान काढायचा. ऑनलाईन व्हायरल होणारी साधारण प्रत्येक चाचणी ही याच पद्धतीची आहे. तुम्ही एकमेकांना किती ओळखता,मनातलं किती जाणता याची ही परीक्षा.

ऑनलाईन चाचण्यांचा नात्यावर काय परिणाम होतो?

एकता डीबी, मानसिक आरोग्य आणि नातेसंबंध प्रशिक्षक, यांनी अशा प्रकारच्या चाचण्या या तुमच्या नात्यावर कसा प्रभाव करू शकतात याविषयी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती दिली आहे. त्या सांगतात की, “कदाचित तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खूप प्रेम असेल पण ते लगेचच लग्नासाठी तयार नसतील. तुम्हाला लग्नाची मागणी घालण्याची एखादी वेगळी योजना त्यांच्या डोक्यात असेल. कदाचित या सगळ्यापेक्षा वेगळं असं काही तरी त्यांच्या डोक्यात त्यावेळी चालू असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीवर हवा तसा प्रतिसाद न येण्याची अनेक कारणे असू शकतात. पण यावरून पात्रता ठरवणे ही थोडी अतिशयोक्ती ठरू शकते.”

तुम्हाला नवऱ्याची परीक्षा का घ्यावीशी वाटते?

दरम्यान, अनेकदा असंही होतं की, आपल्याला आपला जोडीदार हवंय तेच उत्तर देणार नाही याची कल्पना आपल्यलालाही असते, त्यापलीकडे त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे ही आपण जाणून असतो पण तरीही या चाचण्या घेण्याची आपली इच्छा होते. याचं कारण म्हणजे व्हॅलिडेशन मिळवण्याची गरज. आपल्याला आपल्याकडे असलेल्या गोष्टींचं प्रमाणपत्र हवं असतं. एक खेळ म्हणून किंवा मनाचं समाधान म्हणून आपण जर या गोष्टींकडे पाहू शकत नसाल तर अशा चाचण्या आपले नाते बिघडवू शकतात.

हे ही वाचा<< “मला हरव, तुझ्याशी लग्न करेन”, म्हणणारी १०८ किलोची ‘सिंहीण’; गूगल डूडलवर झळकणाऱ्या बानूची पडद्यामागची गोष्ट!

नाती कशी जपावी?

एकता यांनी म्हटल्याप्रमाणे, महिला या ट्रेंडला बळी पडतात. बहुतांश महिलांची भावनिक रचना अशा प्रकारे केली जाते की त्यांना विश्वास, संवाद, सुरक्षितता आणि आश्वासनाची गरज असते. अशा चाचण्यांमधून त्यांना आपल्याला खरंच या गोष्टी मिळतायत का हे पाहण्याची/ तपासण्याची इच्छा होते. खरंतर आपल्या इच्छा पूर्ण होतायत का हे तपासणं चुकीचं नाही पण त्यासाठी आपण थेट संवाद साधणे हा उचित पर्याय ठरेल.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can your husband boyfriend pass this love test why women take online tests for love by partner how love quiz affect your mind svs