वैज्ञानिकांनी कर्करोगाला मारणारी औषधे शरीरात सोडण्यासाठी बायोजेलची निर्मिती केली आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात व इतर पेशींना अपाय होत नाही. कॅनडामधील माँट्रियल रुग्णालयाच्या संशोधन केंद्राने हे संशोधन केले असून त्याची प्रयोगशाळेतील चाचणी यशस्वी झाली आहे. रुग्णांवर ही उपचार पद्धत योग्य पद्धतीने वापरता आली तर कर्करोगाच्या उपचारात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या कर्करोगावर त्याचा उपयोग होईल.
हे बायोजेल मानवी तापमानाला म्हणजे ३७ अंश सेल्सियसला जेल स्वरूपात राहील व कक्ष तापमानाला ते द्रवरूपात असेल त्याचे नाव जेलो असे आहे. बायोजेल हे कर्करोगाशी लढणाऱ्या प्रतिकारशक्ती पेशींना अनुकूल आहे. या पेशींना एकत्र कॅप्सूलमध्ये बद्ध करून सीरिंजप्रमाणे कर्करोगाच्या गाठीत सोडले जाऊ शकते असे रेजीन लॅपॉइंट यांनी म्हटले आहे. या पेशी किंवा कर्करोगरोधक औषधे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाहात न सोडता विशिष्ट भागातच सोडता येतात. पेशींच्या मदतीनेच कर्करोगावर उपचार करता येतात त्यात टी लिंफोसाइटस किंवा टी पेशी शरीरात असतातच त्या कमकुवत असतात त्यामुळे कर्करोगाला मारू शकत नाहीत. पण त्या पेशी जर प्रयोगशाळेत रुग्णाच्या पेशीपासून तयार करून रुग्णाच्या रक्तात परत टोचल्या तर कर्करोगाविरोधात चांगला मुकाबला करतात.
ही प्रतिकारशक्तीवर आधारित उपचार पद्धती पुढच्या अवस्थेतील कर्करोगातही उपयुक्त आहे. काही लाख टी पेशी यात उपयुक्त ठरतात व या पेशी उत्तेजित करणारी रसायनेही टोचता येतात. या बायोजेलची निर्मिती सोफी लेरोज यांनी केली आहे. चिटोसेन या जैवविघटनशील पदार्थापासून ते तयार केले आहे.
क्रस्टाशियन्सच्या कवचापासून हा पदार्थ काढण्यात येतो. ते कक्ष तापमानाला द्रव असते त्यामुळे शरीरात सोडता येते व नंतर शरीरात त्याचे जेल बनते ते बिनविषारी असते त्यामुळे कर्करोगाच्या विरोधात टी पेशींचा संच करून त्यांना लढायला पाठवले जाते. टी पेशींना सैनिकी पेशी असेही म्हणतात.
बायोजेलचे प्रयोग त्वचेचा व मूत्रपिंडाचा कर्करोग बरा करण्यासाठी यशस्वी झाले आहेत. टी लिंफोसाइटस पेशी या जेलमध्ये असतात व त्या दोन ते तीन आठवडय़ात प्रयोगशाळेत वाढवता येतात व नंतर जेलमार्फत सोडल्या जातात त्या कर्करोग पेशींना मारतात. ‘बायोमटेरियल्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा