कर्करोगकारक द्रव्यांच्या संख्येत आता आणखी सात द्रव्यांची भर पडली असून त्यामुळे कर्करोगकारकांची संख्या २४८ झाली आहे असे एका नवीन संशोधनात म्हटले आहे. एकूण पाच विषाणू, एक रसायन व एक धातू द्रव्य यांचा त्यात समावेश आहे. पाच विषाणूंमध्ये एचआयव्ही टाइप १, ह्य़ूमन टी सेल लिफोट्रॉपिक व्हायरस टाइप १, एप्सटेन बार व्हायरस, कापोसी सारकोमा व मर्केल सेल पॉलीओमाव्हायरस यांचा समावेश असून कर्करोगकारक रसायनात ट्रायकोएथिलिनचा उल्लेख करण्यात आला आहे. कोबाल्ट व त्याची संयुगे व आयन्स कर्करोगकारकात असून अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा खात्याच्या १४ व्या अहवालात या कर्करोगकारकांचा समावेश करण्यात आला आहे. जगातील १२ टक्के कर्करोग हे विषाणूंशी संबंधित असून त्यातील पाच विषाणूंवर अजून लस उपलब्ध नाही. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एन्व्हरॉनमेंटल हेल्थ सायन्सेसच्या संचालक लिंडा बिर्नबॉम यांनी सांगितले. या संशोधनामुळे कर्करोग टाळता येण्यासाठी काही उपाययोजना शक्य आहेत. कोबाल्ट व टीसीई रसायनांशी संपर्क टाळणेही शक्य आहे. ज्या पाच विषाणूंचा यादीत समावेश केला आहे त्यामुळे वीस प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. एचआयव्ही १ हा असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतो. संसर्गित पेशींमुळे ह्य़ूमन टी सेल लिफोट्रॉपिक विषाणू पसरतो. सुयांचा वापर, स्तनपान असुरक्षित लैंगिक संबंध यातून त्याचा प्रसार होतो. एपस्टेन बार विषाणू लाळेतून पसरतो. ९० टक्के लोकांना त्याची लागण होते पण सर्वानाच लक्षणे दिसत नाहीत. कारोसी सारकोमा हा लाळेतून पसरतो व लैंगिक संबंधातूनही विशेष करून पुरुष-पुरुष संबंधातून पसरतो.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)