डॉ. अश्विन डिसूझा, पोटाचे विकार आणि कर्करोग शल्यचिकित्सक
- मोठे आतडे (कोलन) आणि गुदाशयाचा कर्करोग का होतो?
कौटुंबिक इतिहास हा कोलोरेक्टल कर्करोगासाठी सर्वात मोठी जोखीम मानली जाते. लाल मांसाचे सेवन, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली आणि जास्त चरबीचे सेवन या बाबींमुळे हा कर्करोग होण्याची शक्यता असते. आई किवा वडिलांना गुदाशयाचा कर्करोग झालेला असेल त्या व्यक्तींनी ४५ व्या वर्षी कोलोनोस्कोपी करावी. तसेच आतडय़ांसंबंधीच्या सवयींमध्ये बदल, गुदद्वारातून रक्तस्राव आणि विनाकारण रक्ताची कमी ही याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे जाणवत असल्यास किंवा ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये विनाकारण अशक्तपणा जाणवत असल्यास शौचाची तपासणी केली पाहिजे. या कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात झाल्यास उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतो. ९५ टक्के रुग्णांमध्ये या कर्करोगाचे नियंत्रण चांगल्या रीतीने करता येते.
- कोलन कर्करोगात कोणत्या चाचण्या आणि उपचार करतात?
कोलोनोस्कोपी या चाचणीमध्ये मोठय़ा आतडय़ांतून एक नळी आत टाकली जाते आणि काही गाठी आहेत का याची तपासणी केली जाते. गाठी आढळल्यास त्याचा काही भाग तपासणीसाठी पाठविला जातो. कर्करोगाच्या टप्प्यानुसार रक्त चाचण्यांसह छाती, पोट, सीईसीटी स्कॅन या चाचण्या कराव्या लागतात. पेट स्कॅन नेहमीच आवश्यक नसते. कोलोनोस्कोपीच्या वेळी लहान गाठी काढणे शक्य असते. परंतु बहुतेक कोलन कर्करोगांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असून गाठीच्या स्थितींवर अवलंबून असते. लॅपरोस्कोपिक पद्धतीने पोट पूर्ण न उघडता अगदी छोटी चीर देऊन ही शस्त्रक्रिया करता येते. लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर बरा होण्याचे प्रमाण जास्त आहे. ही शस्त्रक्रिया शक्यतो कर्करोगतज्ज्ञाद्वारेच करणे योग्य आहे.
- गुदाशयाचा कर्करोग
मोठे आतडे पोटाच्या उजव्या बाजूने सुरू होते व डाव्या बाजूला जाते आणि गुदाशयात संपते. गुदाशय हा आतडय़ाचा शेवटचा भाग आहे. गुदाशयाच्या शेवटी स्फिंक्टर ( शौच कंट्रोल करण्याचा वॉल) असतो, जो आपल्याला मलमार्ग नियंत्रित करण्यास मदत करतो. या कर्करोगाची शस्त्रक्रिया करताना शक्य असल्यास गुदायश वाचविणे महत्त्वाचे असते. या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेपूर्वी अनेकदा रेडिओथेरपी आवश्यक असते. रेडिओथेरपीतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ही थेरपी घेणे गरजेचे आहे. गुदाशयाचा कर्करोग काढून टाकणे आणि गुदद्वाराजवळील स्फिंक्टर वाचवणे अनेक वेळा शक्य आहे.
कर्करोग शल्यचिकित्सकांना याचे प्रशिक्षण दिले गेले असल्याने अशा शस्त्रक्रियांमध्ये स्फिंक्टर वाचवून ओटीपोटावर कायमस्वरूपी शौच पिशवी (स्टोमा) टाळता येते. काही स्थितींमध्ये जर स्फिंक्टर वाचवणे शक्य नसेल तर कायमस्वरूपी शौच पिशवी लावणे मात्र आवश्यक आहे. या पिशवीसह सर्वसामान्य जीवन जगणे शक्य आहे. स्टोमा असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी देशभरात अनेक साहाय्यक सेवा आहेत. स्टोमा हे जीवन देणारे आहे. त्यामुळे जीवनशैलीत फार बदल होत नाहीत.
- नियमित तपासणी का महत्त्वाची आहे?
किमान पाच वर्षे नियमित तपासणी हा उपचाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या कर्करोगाचे निदान वेळेत केल्यास आजाराचे नियंत्रण करणेही शक्य असते. आतडय़ाच्या सवयींमध्ये बदल होत असल्यास, गुदाशयातून रक्तस्राव होत असल्यास किंवा जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवत असेल तर कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका जास्त आहे.
(संकलन – डॉ. शैलेश श्रीखंडे)